पैठणचे तूर खरेदी केंद्र अखेर बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

शेतकऱ्यांनी संयम पाळून सहकार्य केले. त्यामुळेच एवढी मोठी तुर खरेदी करणे शक्‍य झाले. केंद्र बंद करण्यात आल्याचा अहवाल विभागीय सहनिबंधक, तहसीलदारांना देण्यात आला आहे

पैठण - येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी झाल्यामुळे शुक्रवारी (ता. 12) केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी दिली. खरेदी केंद्रावर तालुक्‍यातील दोन हजार 17 शेतकऱ्यांची एकूण 38 हजार 31 क्विंटल तूर खरेदी झाली.

शासनाने हमी भाव जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर न देता शासनाला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे खरेदीच्या काळात मोठी गर्दी उसळली. कधी बारदाना तर कधी शासनाच्या सुट्यांमुळे अनेक वेळा केंद्रे बंद पडले. शासनाने जाहीर केलेल्या मुदतीची तारीख संपल्याने केंद्र बंद राहिले होते. त्यामुळे या बंदच्या काळात शेतकऱ्यांत रोषाला बाजार समिती, सहायक निबंधक, जिल्हा मार्केटींग फेडरेशन व तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघ यांच्या व्यवस्थापन यंत्रणेला सामोरे जावे लागले होते; परंतु बाजार समिती सभापती राजू भुमरे, सचिव नितीन विखे, श्रीराम सोन्ने, सहकार अधिकारी ललीत कासार, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाबूराव पडुळे, उपाध्यक्ष बळिराम औटे यांनी लक्ष देऊन व शेतकऱ्यांसोबत संवाद साधून परिस्थिती हाताळली. त्यामुळे केंद्रावर आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी व्यवस्थित पार पडली. शुक्रवारी केंद्रात श्री. सोन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली. तेथे एकाही शेतकऱ्याची तूर शिल्लक नसल्याची खात्री करून केंद्र बंद करण्यात आले. या वेळी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी बी. डी. पाटील, एस. जी. पोफळे, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बळिराम औटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

"पैठण येथे बाजार समितीच्या यार्डात शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. प्रारंभी नाफेडअंतर्गत तूर खरेदी करण्यात आली. ही मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तुरीची खरेदी केली. या काळात आलेल्या तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी संयम पाळून सहकार्य केले. त्यामुळेच एवढी मोठी तुर खरेदी करणे शक्‍य झाले. केंद्र बंद करण्यात आल्याचा अहवाल विभागीय सहनिबंधक, तहसीलदारांना देण्यात आला आहे.''
-श्रीराम सोन्ने, सहायक निबंधक, पैठण.