माल वाहतूकदारांचा शनिवारपासून चक्काजाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

औरंगाबाद - विविध मागण्यांसाठी माल वाहतूकदार शनिवारपासून (ता. आठ) देशव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहेत. यात औरंगाबाद गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशनही सहभागी होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष फैयाज खान यांनी दिली.

मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार, नवी दिल्ली व महासंघ मुंबई, बीजीटी मुंबईतर्फे देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे. आयआरडीएने थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये केलेली 50 टक्के दरवाढ मागे घ्यावी, परिवहन कार्यालयाने विविध सेवांमध्ये केलेली भरमसाट शुल्कवाढ मागे घ्यावी, मोटार वाहन कायद्यात केलेली दंडात्मक रकमेतील वाढ मागे घ्यावी, भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी सर्व ऑनलाइन पेमेंट सिस्टीम सुरू करावी, जुने वाहन मोडीत काढण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्यात. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी अकराला पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यभरातील सर्व वाहतूक संघटनांचे पदाधिकारी चक्काजाम आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे फैयाज खान यांनी सांगितले.