जालन्याच्या हमरस्त्यांवर ट्रॅव्हल्स राज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

जालना - बसस्थानक परिसरात उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांनी आता आपले बस्तान भोकरदन नाका परिसरात बसवले आहे. यामुळे सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, स्थानिक नागरिक वैतागून गेले आहेत. 

जालना - बसस्थानक परिसरात उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांनी आता आपले बस्तान भोकरदन नाका परिसरात बसवले आहे. यामुळे सायंकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, स्थानिक नागरिक वैतागून गेले आहेत. 

बसस्थानक परिसरातील रोडचे सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांना शहराच्या बाहेर आपल्या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र, ट्रॅव्हल्स चालकांनी पोलिसांच्या सूचनांना केराची टोपली दाखवत मागील तीन महिन्यांपासून भोकरदन नाक्‍यावर आपल्या गाड्यांचा नवीन थांबा निर्माण केला आहे. त्यामुळे मोठ्या व्हॉल्वो बसेस मागे-पुढे घेताना वारंवार वाहतूक कोंडी होत असे. परिणामी अपघातांना आमंत्रणही मिळत आहे. 

ट्रॅव्हल्समध्ये बसणाऱ्यांसाठी येणाऱ्या प्रवाशांना घेऊन येणाऱ्या रिक्षा, फेरीवाले यामुळे या परिसरात गोंगाटाचे वातावरण निर्माण होत आहे. अनेकदा रिक्षा चालक व प्रवाशांमध्ये पैशावरून वाद होत असल्याने स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या तोंडी सूचनांना ट्रॅव्हल्स चालक जुमानत नाहीत. या संदर्भात पोलिसांना माहिती देऊनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे नागरिकांनी आता थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वाहतूक पोलिस लक्ष देईनात 
भोकरदन नाक्‍यावर ट्रॅव्हल्स चालकांनी सुरू केलेला थांबा हा वाहतूक पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे निर्माण झाला आहे. अनेकदा या संदर्भात वाहतूक पोलिस कर्मचारी, अधिकारी यांना यासंदर्भात माहिती देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आता तरी वाहतूक पोलिस भोकरदन नाक्‍यावरील ट्रॅव्हल्स चालकांनी सुरू केले हा अनधिकृत थांबा येथून हलवतील की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

Web Title: Travels on Jalna road