तुळजाभवानी मातेच्या पूजेच्या दरात वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या श्रीखंड सिंहासन पूजेच्या करवाढीसह अभिषेकासाठी ५० रुपये कर लावण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३१) घेण्यात आला आहे. ओटी भरण्यासाठी कोणताच कर न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिषेक करवाढीची अंमलबजावणी येत्या सात ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

तुळजापूर - तुळजाभवानी मातेच्या श्रीखंड सिंहासन पूजेच्या करवाढीसह अभिषेकासाठी ५० रुपये कर लावण्याचा निर्णय सोमवारी (ता. ३१) घेण्यात आला आहे. ओटी भरण्यासाठी कोणताच कर न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभिषेक करवाढीची अंमलबजावणी येत्या सात ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

तुळजाभवानी मातेच्या विविध पूजांच्या करवाढीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. यासंदर्भात तुळजाभवानी मंदिर समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी पाळीकर पुजारी मंडळाचे सज्जन साळुंखे, विपिन शिंदे, नागेश साळुंखे, भारत कदम, भोपे मंडळाचे पदाधिकारी आप्पासाहेब पाटील, बुवासाहेब पाटील, सुधीर कदम-परमेश्वर, तुळजाभवानी उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, श्रीराम अपसिंगेकर आदी उपस्थित होते.

तुळजाभवानी मातेच्या विविध पूजा करवाढीसंदर्भात चर्चा झाली. सिंहासन पूजा करवाढ करण्याचा निर्णय झाला. त्यामध्ये श्रीखंडाच्या सिंहासन पूजेसाठी ४५१ रुपये कर होता. तो आता एक हजार एक रुपये करण्यात आला. दह्याच्या सिंहासन पूजेसाठी ३५१ रुपयांवरून ९०० रुपये करण्याचा निर्णय झाला. दरम्यान, तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा सकाळी सहा वाजताच पहिल्यांदा घेण्यात येतील. त्यात अकरा भाविकांना मुभा असेल. सिंहासन पूजेनंतर अभिषेक होतील. तुळजाभवानी मातेस ओटी भरणासाठी कोणताही कर लागणार नाही.

 उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो यांनी अभिषेकाची करवाढ झाल्याच्या माहितीस दुजोरा दिला. तर मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सुनील पवार यांनीही अभिषेकाची करवाढ येत्या पौर्णिमेपासून होणार आहे, असे सांगितले.

पूजेसाठीची नवीन करवाढ, कंसात पूर्वीचे दर 
श्रीखंडाचे सिंहासन     : १००१ रुपये (४५१ रुपये)
दह्याचे सिंहासन     : ९०० रुपये (३५१ रुपये)
अभिषेक     : ५० रुपये (१० रुपये)