वीस रुपयांसाठी केला कंपनीमालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

वाळूज औद्योगिक वसाहतीतील घटना, मुंबईतून आरोपी ताब्यात
वाळूज - झाडलोटासह सांगेल ते काम करणाऱ्या एका तरुणाने वीस रुपयांसाठी एका ७५ वर्षे वयाच्या कंपनीमालकाचा दारूच्या नशेत शुक्रवारी (ता. एक) त्याच्याच कंपनीत खून केल्याची माहिती संशयितानेच सोमवारी (ता. ११) पोलिसांना दिली. दरम्यान, या आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता त्यास गुरुवारपर्यंत (ता.१४) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई गोरेगाव येथील रामेश्वर श्रीराम दरक (वय ७५) यांची वाळूज औद्योगिक वसाहतीतील डब्ल्यू सेक्‍टरमध्ये कंपनी आहे. कंपनी बंद असल्याने मालक रामेश्‍वर दरक हे अधूनमधून कंपनीत येत असत. ते कंपनीत येत त्यावेळी गणेश रघुनाथ येवले (वय २३, रा. हदगाव, जि. नांदेड) हा दरक यांच्या कंपनीत येऊन झाडलोट व साफसफाईसारखी कामे करीत असे. 

शुक्रवारी (ता. १) रामेश्‍वर दरक हे कंपनीत आलेले असताना आरोपी गणेश येवले हा कंपनीत गेला आणि रामेश्‍वर दरक यांच्याकडे मागील बाकी तीस रुपये व आणखी वीस रुपये जास्त द्या, अशी मागणी केली. मात्र तुझे मागचे तीस रुपये घे, जास्तीचे मिळणार नाहीत, असे दरक म्हणाल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या गणेशने शेजारीच पडलेले लोखंडी फावडे उचलून खुर्चीवर बसलेल्या रामेश्वर दरक यांच्या डोक्‍यात घातले. ही घटना सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. डोक्‍यात फावड्याच्या फटक्‍याने दरक हे रक्‍तबंबाळ होऊन खुर्चीवर बसल्या जागीच बेशुध्द पडले. त्यांचा खून झाल्याचे लक्षात येताच गणेश येवले याने कंपनीचे शटर खाली ओढून कुलूप न लावता मुंबईला पसार झाला होता. रविवारी (ता. १०) सकाळी पावणेआठच्या सुमारास गणेश येवले याने मुंबई येथील न्यायनगर पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची हकीकत सांगितली. त्यानंतर हा खुनाचा प्रकार समोर आला.

गुरुवारपर्यंत कोठडी
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात, पोलिस निरीक्षक ए. डी. जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, जिवडे, धनेधर यांच्या पथकाने मुंबईत जाऊन गणेश येवले यास ताब्यात घेतले. सोमवारी (ता. ११) सकाळी त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने ता. १४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक ए. डी. जहारवाल हे करीत आहेत.