दिवसभरात उचलला वीस टन कचरा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

औरंगाबाद - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कचराप्रश्‍न गांभीर्याने घेतल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत. शनिवारी (ता.२१) औरंगपुरा, रॉक्‍सी टॉकीज, पैठणगेट येथील सुमारे २० टन कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे स्क्रीनिंगसाठी पाठविण्यात आला, तर ४० टन खत शेतकऱ्यांना मोफत देण्यात आल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग यांनी सांगितले. 

महापालिकेचे विभागप्रमुख, वॉर्ड अधिकारी, अभियंता, स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेत महापौरांनी शुक्रवारी (ता.२०) २१ कलमी कार्यक्रम आखून दिला. त्यानंतर शनिवारी सकाळीच त्यांनी शहरात पाहणी केली. त्यानंतर औरंगपुरा येथून आठ, रॉक्‍सी टॉकीज परिसरातून पाच व पैठणगेट पार्किंग येथून सात असा २० टन कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे स्क्रीनिंग मशीनवर प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला. कचऱ्यापासून तयार झालेले ४० टन खत शेतकऱ्यांना देण्यात आले.

नाही तिथे ‘सीआरटी’चे काम 
कचराप्रश्‍न प्रभाग एक, दोन व तीनमध्ये गंभीर असताना महापालिकेने नियुक्त केलेली ‘सीआरटी’ ही संस्था प्रभाग सहामध्येच काम करत आहे. त्यांना समस्या असलेल्या भागात काम करण्याच्या सूचना करण्यात आल्याचे श्री. भालसिंग यांनी सांगितले.  

८० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण 
कचरा वर्गीकरणात सुधारणा झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्तांनी केला. सुरवातीपासूनच प्रभाग चार ते सहामध्ये कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाटीचे नियोजन झालेले आहे. नगरसेवकांनी वॉर्डावॉर्डांत कंपोस्टिंगवर काम केल्याने या भागाची परिस्थिती समाधानकारक आहे. याप्रमाणेच आता प्रभाग-७ व ८ मध्ये प्रगती होत आहे.

घंटागाड्या, मनुष्यबळ वाढविले  
न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने रिक्षा व अतिरिक्‍त कर्मचारी कामाला लावले आहेत. नागरिक रस्त्यांवरच कचरा टाकत असल्याने आता शंभर टक्के घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे नियोजन केले जात आहे, असे भालसिंग यांनी नमूद केले. 

Web Title: Twenty tons of garbage picked up during the day