बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

लामजना - नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी दुचाकीवरून साहित्य घेऊन जाणाऱ्यांवर जावळी (ता. औसा) येथील दोन युवकांवर गुरुवारी (ता. पाच) सकाळी काळाने घाला घातला. युवकांच्या दुचाकीला बसने दिलेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

लामजना - नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी दुचाकीवरून साहित्य घेऊन जाणाऱ्यांवर जावळी (ता. औसा) येथील दोन युवकांवर गुरुवारी (ता. पाच) सकाळी काळाने घाला घातला. युवकांच्या दुचाकीला बसने दिलेल्या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

पोलिसांनी सांगितले, की जावळी येथील तुकाराम सुरवसे यांचे गुरुवारी (ता. चार) रात्री निधन झाले. जावळी येथील नितीन बब्रुवान हेंबाडे (वय 25) यांचे ते मामा, तर संजय रामराव मुगळे (वय 28) यांचे ते काका होते. यामुळे हे दोघेही सुरवसे यांच्या अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी मदत करीत होते. या दोघांना लामजना (ता. लातूर) येथून अंत्यसंस्काराचे साहित्य आणण्यासाठी पाठवण्यात आले. दोघेही सकाळी दुचाकीवरून लामजना येथे आले. साहित्य घेऊन ते सकाळी साडेनऊ वाजता परत निघाले. लामजना-उमरगा रस्त्यावर लामजना प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला उमरगाकडे जाणाऱ्या निलंगा-कलबुर्गी या बसने जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीसह दोघेही बसच्या चाकाखाली आले. बसने दुचाकीला वीस फुटांपर्यंत फरपटत नेले. या घटनेत नितीन हेंबाडे व संजय मुगळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर बसचालक मल्लिकार्जुन धनराज बिराजदार बस तिथेच सोडून फरार झाला. दुपारी तो किल्लारी (ता. औसा) पोलिस ठाण्यात दाखल झाला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अभिमन्यू माधवराव हेंबाडे यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर काही नातेवाइकांनी सकाळी (कै.) सुरवसे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दुपारी या दोन युवकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेतील मृत नितीन हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर संजय मुगळे हा शेती करत होता. त्याच्यामागे दोन मुलगे व परिवार आहे. किल्लारीचे सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. वाघमोडे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स