कुठे अस्वच्छता, कुठे स्वच्छतागृहात बकेटच नाही!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

औरंगाबाद - स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत महापालिका सहभागी झाली आहे.

औरंगाबाद - स्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत देशपातळीवर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत महापालिका सहभागी झाली आहे.

दोन हजार गुणांच्या स्पर्धेतील स्वच्छतेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 20) केंद्रीय पथक दाखल झाले. पथकाने सकाळी दहा वाजेपासून शताब्दीनगर येथून पाहणीला सुरवात केली. शताब्दीनगरातील अस्वच्छता व सिडको एन-7 येथील स्वच्छतागृहात बकेट नसल्याचे पाहून पथकातील परीक्षकांनी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अन्य भागातही काही उणिवांवर त्यांनी बोट ठेवले, त्या वेळी महापालिकेचे अधिकारी निरुत्तर झाले.

क्‍वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या या पथकात वरिष्ठ सहायक शैलेश बंजारिया, कनिष्ठ सहायक विजय जोशी आणि गोविंद गिरामे यांचा समावेश आहे. पथकातील वरिष्ठांनी 900 गुणांच्या प्रश्‍नावलीची व डेटाची पाहणी केली. शताब्दीनगर येथून पाहणीसाठी सुरवात झाली. तिथे पथकातील अधिकारी पोचल्यानंतर सर्वत्र अस्वच्छता दिसून आली. यावर त्यांनी महापालिकेचे लोक सफाईसाठी येतात का? अशी विचारणा जमलेल्या महिलांकडे केली तेव्हा सर्वांनी कोणीच येत नाही असे उत्तर दिले. यावरून त्यांनी महापालिकेचे प्रतिनिधी प्रमोद खोब्रागडे, दीपक जोशी यांची चांगलीच कानउघाडणी केली. सायंकाळपर्यंत या भागात साफसफाई करून त्याचे छायाचित्र पाठवण्यास सांगितले. यानंतर सिडको एन 7 भागात हे पथक पोचले. तेथील स्वच्छतागृहाची पाहणी केली असता नागरिकांनी पाणी येत नसल्याची तक्रार केली; तर स्वच्छतागृहात पाणी घेण्यासाठी बकेट नसल्यावरून पथकातील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. यानंतर आझाद चौक, रहेमानिया कॉलनी, किराडपुरा, नवाबपुरा, कॅनॉट प्लेस या भागात; तर दुसऱ्या पथकाने शहराच्या अन्य भागात फिरून पहिल्या दिवशी पाहणी केली.

लोकसहभाग वाढवण्यासाठी पोस्टर, बॅनर्स
केंद्रीय पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. शुक्रवारी (ता. 20) पथकाचा पहिला दिवस होता. स्वच्छ सर्वेक्षण 2017 स्पर्धेत शहर सहभागी आहे. आपण तयार आहात का? असा शहरवासीयांना प्रश्‍न विचारून लोकसहभाग वाढवणारे बॅनर्स, फ्लेक्‍स शहराच्या विविध भागांत लावण्यात आले होते. महापालिका मुख्यालयातही असे बॅनर्स शुक्रवारी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.