उस्मानाबाद जिल्ह्यात अवेळी पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पारा चाळिशीच्या आसपास, उकाडा जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज 

उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत अवेळी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

पारा चाळिशीच्या आसपास, उकाडा जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज 

उस्मानाबाद - जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत अवेळी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

यावर्षी मार्चपासूनच तापमानाने चाळिशी ओलांडली. त्यामुळे उष्णतेची लाट कायम आहे. दरम्यान, मेच्या पहिल्याच आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे उकाडा वाढला. शुक्रवारी (ता. चार) सकाळपासूनच कडक उन्हाला सुरवात झाली. ३८.७ अंशापर्यंत पारा चढला. सकाळी साडेनऊ-दहा वाजता कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या व्यक्ती चेहऱ्यावर रुमाल बांधून जात असल्याचे दिसत होते. दुपारनंतर स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे उकाडा जाणवत होता. चारच्या सुमारास ढगांचा गडगडाटही सुरू होता. ढगाळ वातावरणामुळे दुपारी अडीचपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवण्यास सुरवात झाली.

रात्री उशिरापर्यंत हा उकाडा कायम होता. पुढील तीन ते चार दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, शुक्रवारनंतर (ता.१२) आकाश निरभ्र होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान कमाल तापमानाचा पारा ३९ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

काही ठिकाणी पाऊस
गेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या काही भागांत अवेळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे काढणी केलेल्या ज्वारीच्या कणसाचे व कडब्याचे नुकसान झाले. शिवाय गारपिटीने द्राक्षांनाही फटका बसला. मात्र, काही भागांत फक्त ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. काही वेळा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटही सुरू असतो.