वैद्यनाथ बॅंकेचा व्यवहार कायदेशीरच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

परळी - येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बॅंकेच्या व्यवहारात कुठेही चुकीचा प्रकार झाला नाही, सर्व व्यवहार कायदेशीरच झाले आहेत, या संबंधी होणारी चर्चा दिशाभूल करणारी आहे, असे स्पष्टीकरण या बॅंकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी शनिवारी येथे दिले.

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वैद्यनाथ बॅंकेच्या दहा कोटी दहा लाख रुपयांच्या रकमेच्या संदर्भात काही शाखांमध्ये जाऊन शुक्रवारी (ता.23) "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचे जैन यांनी सांगितले. केंद्र सरकारने एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर वैद्यनाथ बॅंकेच्या विविध शाखांत ग्राहकांनी जमा केलेल्या जुन्या नोटा परळीतील राष्ट्रीयीकृत बॅंकांनी घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे सुमारे पंचवीस कोटी रुपयांची रक्‍कम येथून मुंबईत नेण्यात आली. त्यातील पंधरा कोटी रुपये राज्य सहकारी बॅंकेत जमा करण्यात आले. उर्वरित दहा कोटी रुपये जमा करून घेण्यास या बॅंकेने असमर्थता दर्शविल्यानंतर पुणे येथील अन्य बॅंकेत ही रक्‍कम भरण्यासाठी घाटकोपर येथील शाखेतून नेली जात असताना मुंबईत पोलिसांनी ती ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या या रकमेची नोंद बॅंकेकडे उपलब्ध आहे. यात कसलाही गैरव्यवहार झालेला नाही. बॅंकेचा सर्व व्यवहार पारदर्शक असल्याचेही जैन यांनी म्हटले आहे.