बहुमत शिवसेनेच्या झोळीत; दोरी मात्र भाजपच्या हाती

Shilpa-Pardeshi
Shilpa-Pardeshi

वैजापूर - वैजापूर नगरपालिका निवडणुकीत नगरसेवकपदाच्या तेवीसपैकी तेरा जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपला नऊ, तर काँग्रेसला एका जागेवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, रिपब्लिकन पक्षाला खातेही उघडता आले नाही. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व भाजप या दोन पक्षांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार शिल्पा परदेशी यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या सय्यद तशफा अझर अली यांचा दोन हजार त्र्याहत्तर मतांनी पराभव केला. परदेशी यांना तेरा हजार ९४६, तर सय्यद तशफा अझर अली यांना अकरा हजार ८७३ मते मिळाली.

मात्र, पालिकेतील २३ पैकी सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आणत शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली. पंधरा वर्षे नगरपालिका ताब्यात असलेल्या काँग्रेसचा एकमेव उमेदवार विजय झाला. ता. ६ एप्रिलरोजी वैजापूरच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांसाठी मतदान झाले होते. काँग्रेसचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या डॉ. परदेशी यांच्या मदतीने पहिल्यांदाच नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने शक्ती पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ एप्रिलरोजी शहरात सभाही घेण्यात आली. डॉ. परदेशी यांचे वैयक्तिक काम, जनसंपर्क आणि भाजपचे बळ या जोरावर भाजपने नगराध्यक्षपद पटकावत नऊ नगरसेवक निवडून आणले; पण बहुमतासह सत्तेचे स्वप्न मात्र भंगले. 

शिवसेनेची कडवी झुंज 
वैजापूर शहरात शिवसेनेची चांगली ताकद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत शिवसेनेच्या सय्यद तशफा यांनी सुरवातीला २१० मतांची आघाडी घेतली होती. पण, भाजपच्या शिल्पा परदेशी यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली आणि विजय मिळविला. 

वाणींना धक्का 
शिवसेनेचे माजी आमदार आर. एम. वाणी यांना नगरपालिका निवडणुकीत दुसऱ्यांदा धक्का बसला. वाणी यांच्या प्रभागात त्यांचे पुत्र सचिन वाणी यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या शैलेश चव्हाण यांनी दोनशे मतांनी इथे विजय मिळविला. 

काँगेसचा एकमेव उमेदवार विजयी 
परदेशी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे पक्षाचे शहरातील अस्तित्वच संपल्यासारखी परिस्थिती होती. तीनपैकी दोन उमेदवारांनी आधीच माघार घेतल्याने काँग्रेसचे उल्हास ठोंबरे हे एकटेच निवडणुकीत लढले. त्यांचा विजय झाल्यामुळे पंधरा वर्षे सत्तेवर असलेल्या काँगेसचा आता एकच सदस्य सभागृहात राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com