'महिलांच्या पुढाकारातूनच गावे होतील पाणंदमुक्त '

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

लातूर - पुरुषप्रधान संस्कृतीत सातत्याने महिलांना मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रवृत्ती गावच्या विकासाचा अडसर बनू पाहत आहे. गावे पाणंदमुक्त झाली तरच गावचा विकास होणार आहे. यात महिलांनी पुढाकार घेतला तरच गावे पाणंदमुक्त होतील, असा विश्वास पाटोदा (ता. औरंगाबाद) या आदर्श गावचे प्रणेते भास्करराव पेरे पाटील यांनी येथे व्यक्त केला. 

लातूर - पुरुषप्रधान संस्कृतीत सातत्याने महिलांना मागे ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. हीच प्रवृत्ती गावच्या विकासाचा अडसर बनू पाहत आहे. गावे पाणंदमुक्त झाली तरच गावचा विकास होणार आहे. यात महिलांनी पुढाकार घेतला तरच गावे पाणंदमुक्त होतील, असा विश्वास पाटोदा (ता. औरंगाबाद) या आदर्श गावचे प्रणेते भास्करराव पेरे पाटील यांनी येथे व्यक्त केला. 

जिल्हा परिषदेच्या वतीने येथे गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यातील बचतगटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला दोन हजार महिलांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मेघमाळे उपस्थित होते. माझ्या गावची परिस्थितीही इतर गावांसारखीच होती. मी तर केवळ सातवी पास झालेला माणूस. पण महिलांचे प्रश्‍न अभ्यास करुन समजून घेतले. महिला दुःखी आहेत पण हुशार आहेत हे लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या सहकार्याशिवाय गावचा विकास होणार नाही. त्यांना सोबत घेऊन काम केले अन्‌ पाहता पाहता गावाचा विकास झाला. या गावाने आज महिलांमुळे अनेक पुरस्कार प्राप्त केले, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

आज माझ्या गावात प्रत्येक घरात चार नळ आहेत. सांडपाणी, पिण्याचे पाणी, मिनरल वॉटर व गरम पाण्याचा एक नळ आहे. महिलांमधील संवाद वाढविण्यासाठी धोबीघाट सुरू केला. महिला ही जागतिक बॅंकेपेक्षा मोठी आहे. काटकसर कशी करावी हे तिच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्याच पुढाकाराने गावाने विकास केला, असे ते म्हणाले.  पाणंदमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. रस्त्यावर कोणी माणूस डबा घेऊन जात असेल तर तुम्ही केवळ थुंकण्याचे काम करा, गाव आठ दिवसांत पाणंदमुक्त होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले तर आभार बालाजी पुरी यांनी मानले. 

पदाधिकाऱ्यांत उदासीनता
जिल्हा पाणंदमुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासन सरसावले आहे. पण पदाधिकारी मात्र उदासीन दिसून येत आहेत. आजच्या मेळाव्यात देखील बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, कृषी सभापती बजरंग जाधव, समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी उद्‌घाटन करून काढता पाय घेतला. महिला बालकल्याण सभापती संगीता घुले मात्र बसून होत्या. अध्यक्ष व उपाध्यक्षांसह इतर सदस्य मेळाव्याकडे फिरकलेही नाहीत.

Web Title: The villages will be affected by the initiative of women