मुख्यमंत्र्यांच्या मदतीला लातूरकरांचा 'विठ्ठल'

हरी तुगावकर
सोमवार, 23 जुलै 2018

फडणवीस यांनी पूजा झाल्यानंतर आठवणीने लातूरकरांनी दिलेल्या या मुर्तीचे छायाचित्र तातडीने फेसबूकवरही अपलोड केले आहे. अपघातातून वाचणे व आता पूजेसाठी देखील लातूरकरांचा `विठ्ठल`च मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावल्याच्या भावना लातूरकरांत आहेत.

लातूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला न जाण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत `वर्षा` बंगल्यावर सोमवारी (ता. 23) पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा केली. लातूरकरांनी फडणवीस यांना दिलेली ही विठ्ठल रखुमाईची मुर्ती होती. इतकेच नव्हे तर निलंगा येथे गेल्या वर्षी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देखील ही मुर्ती फडणवीस यांच्यासोबत होती. या `विठ्ठला`मुळेच मी अपघातातून वाचलो असे भावूक उद्गारही त्यावेळी फडणवीस यांनी काढले होते. आजच्या आषाढी एकादशीला देखील लातूरकरांचाच विठ्ठल त्यांच्या पुजेसाठी मदतीला धावून आला.

गेल्या वर्षी ता. 24 मे 2017 ला जलयुक्त शिवाराची कामे पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱयावर आले होते. शहरातील कार्यक्रम आटोपून फडणवीस हे कृषी मूल्य आयोगाचे अध्य़क्ष माजी आमदार पाशा पटेल यांच्या विठ्ठल हाऊसिंग सोसायटीतील घरी गेले होते. त्यावेळी या भागाचे काँग्रेसचे नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी फडणवीस यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट देवून सत्कार केला होता. यावेळी पाशा पटेल, वसंत पाटील, विजय राजे, सचिन वलसे, मच्छिंद्र थोरात आदी उपस्थित होते. हा सत्कार झाल्यानंतर फडणवीस हे खरोसा येथे किर्तनाच्या कार्यक्रमाला गेले. त्यावेळी ही मुर्ती त्यांच्यासोबतच होती. त्यानंतर ता. 25 मे रोजी निलंगा तालुक्यात जलयुक्त शिवाराची कामे त्यांनी पाहिली. दुपारी त्यांच्या हेलिकॉप्टरचा मोठा अपघात  झाला होता. यातून ते बालंबाल बचावले होते. यावेळी त्यांच्यासोबत ही विठ्ठल रखुमाईची मुर्तीही होती. अपघातातून वाचल्यानंतर फडणवीस यांनी आपण विठ्ठलामुळे वाचल्याचे भावूक उद्गारही काढले होते.

फडणवीस यांनी पूजा झाल्यानंतर आठवणीने लातूरकरांनी दिलेल्या या मुर्तीचे छायाचित्र तातडीने फेसबूकवरही अपलोड केले आहे. अपघातातून वाचणे व आता पूजेसाठी देखील लातूरकरांचा `विठ्ठल`च मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावल्याच्या भावना लातूरकरांत आहेत.

Web Title: vitthal statue from latur helps devendra fadnavis