डॉ. आंबेडकरांना पराभूत करणाऱ्यांना मते देणार का? - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

लातूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली. असे असताना डॉ. आंबेडकर हे लोकसभेत येऊ नयेत म्हणून भंडारा व दादर या दोन मतदारसंघांतून त्यांना कॉंग्रेसने पराभूत केले. अशा कॉंग्रेसला महापालिकेच्या निवडणुकीत मतदान करणार का? असा प्रश्‍न उपस्थित करून देशभरात सुरू असलेल्या परिवर्तनाच्या लाटेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केले. 

येथील मार्केट यार्डात गुरुवारी (ता. 13) महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. बाबासाहेब कोरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, माजी महापौर अख्तर मिस्त्री, मोहन माने, नीलेश ठक्कर उपस्थित होते. 

महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मी चार दिवस येथे होतो; पण त्यावेळी लातूरचे शांघाय करू असे सांगितले गेल्याने लातूरकर बळी पडले. त्यांनी कॉंग्रेसला मतदान केले. आमचा एकही सदस्य निवडून आला नाही. आजची परिस्थिती वेगळी आहे. देशात व राज्यात भाजप हा एक नंबरचा पक्ष झाला आहे. परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे विकासासाठी बदलत चाललेल्या वातावरणासोबत राहा, असे श्री. दानवे म्हणाले. 

साखर कारखान्याला पाणी देऊन कॉंग्रेसवाल्यांनी मानवनिर्मित दुष्काळ केला. पण भाजपने रेल्वेने पाणी दिले. महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असताना विविध करांतून आलेला निधी विकासासाठी न वापरता भ्रष्टाचार केला. आता "सबका साथ सबका विकास' साधणाऱ्या भाजपला संधी देऊन जनतेच्या पैशातून भ्रष्टाचार करणाऱ्या कॉंग्रेसला घरी बसवा, असे आवाहन श्री. दानवे यांनी केले. 

महापालिकेत भाजपची सत्ता आली तर दुष्काळातील पाणीपट्टी माफ करण्यात येईल. शहरात सीसीटीव्ही बसविण्यात येतील. प्रधानमंत्री आवास योजनेतून हमालाच्या घरकुलांसाठी पक्षाच्या वतीने अर्ज करून त्याचे शुल्कही भरण्यात येईल, पहिल्या 45 दिवसांत ही कामे केले जातील, असे पालकमंत्री निलंगेकर म्हणाले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: vote to the will of those who lost dr. Ambedkar?