हिंगोलीत भाजपची धडक, शिवसेना सत्तेबाहेर 

प्रकाश सनपूरकर 
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पंचायत समितीचा निकाल 
* हिंगोलीमध्ये त्रिशंकू 
* वसमतमध्ये भाजपचे बहुमत 
* औंढा नागनाथमध्ये शिवसेनेचे वर्चस्व 
* सेनगावमध्ये त्रिशंकू स्थिती 
* कळमनुरीचे चित्र सायंकाळपर्यंत अस्पष्ट

हिंगोली - हिंगोली जिल्हा परिषदेत सत्ता असलेल्या शिवसेनेला धक्का देत कॉंग्रेस व "राष्ट्रवादी' आघाडीने चोवीस जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी तीन अपक्षांच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत. तर दुसरीकडे भाजपने दहा जागा व वसमत पंचायत समितीत बहुमत मिळवले आहे. वसमतमध्ये भाजप तर औंढा पंचायत समितीवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले आहे. हिंगोलीमध्ये त्रिशंकूची स्थिती आहे. 

हिंगोली जिल्हा परिषदेत गेल्या वेळी पन्नासपैकी सव्वीस जागा मिळवून शिवसेना सत्तेत बसली होती. तर तेवीस जागा कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'कडे होत्या. यावेळी या आकडेवारीत फारसा बदल झालेला नाही. मात्र शिवसेनेच्या सत्तेचा हिस्सा भाजपने मिळवला आहे. 

शिवसेनेच्या विरोधात भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे व नेते ऍड. शिवाजी जाधव यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्याला काही प्रमाणात यश मिळाले. भाजपला दहा जागा तर मिळाल्याच पण वसमत पंचायत समितीत स्पष्ट बहुमतही मिळाले. 
या विजयाने ऍड. जाधव यांचे नेतृत्व भक्कम झाले असून वसमत विधानसभा मतदारसंघात भाजपचे स्थान बळकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वसमतच्या राजकारणात नवीन पिढीचा उदय झाल्याचेही या निकालावरून स्पष्ट झाले आहे. "राष्ट्रवादी'चे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीही "राष्ट्रवादी'च्या सहा जागा राखून स्वतःचे स्थान कायम ठेवले आहे. 

"राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्या पत्नी जवळाबाजार गटातून पराभूत झाल्या. शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंडितराव शिंदे यांच्या पत्नीही पराभूत झाल्या. भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मिलिंद यंबल यांनाही पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे हे दुसऱ्यांदा विजयी झाले. भाजप नेते फुलाजी शिंदे पराभूत झाले. हिंगोली विधानसभा मतदारसंघात आमदार तानाजी मुटकुळे यांना केवळ चारच जागा मिळवता आल्या. शिवसेनेने सात तर कॉंग्रेसने पाच जागा मिळवल्या. 

जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये हिंगोली पंचायत समिती त्रिशंकू स्थितीत कायम राहिली. वसमतमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. सेनगाव पंचायत समितीमध्येही त्रिशंकूची स्थिती आहे. औंढा नागनाथमध्ये बारा जागा मिळवून शिवसेनेने सत्ता कायम ठेवली. 

तिघांवर फिरणार सत्तेचा काटा? 
तीन अपक्षांपैकी एक शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्‍वर पतंगे यांच्या पत्नी नीलावती पतंगे आहेत. विठ्ठल चौतमल व कॉंग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून लढलेले अजित मगर यांनीही बाजी मारली. या तीन अपक्षांवर आता सत्तेचा काटा फिरणार आहे. 

पक्षीय बलाबल 
एकूण जागा - 52 
शिवसेना - 15 
भाजपा - 10 
राष्ट्रवादी - 12 
कॉंग्रेस - 12 
अपक्ष - 3 

पंचायत समितीचा निकाल 
* हिंगोलीमध्ये त्रिशंकू 
* वसमतमध्ये भाजपचे बहुमत 
* औंढा नागनाथमध्ये शिवसेनेचे वर्चस्व 
* सेनगावमध्ये त्रिशंकू स्थिती 
* कळमनुरीचे चित्र सायंकाळपर्यंत अस्पष्ट

#VoteTrendLive

Web Title: #VoteTrendLive hingoli zp election bjp wins