उस्मानाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

वाशी तालुक्‍यात तीन गट आहेत. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एका गटावर विजय मिळाला तर पंचायत समितीच्या सहा गणांपैकी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी दोन गणांमध्ये विजय मिळाला आहे.

उस्मानाबाद - जिल्हा परिषदेची एकहाती सत्ता एकाही पक्षाला मिळाली नसल्याने यंदाही त्रिशंकु परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 55 जागांपैकी सर्वाधिक 26 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळाला. कॉंग्रेसला 13, तर शिवसेनेला 11 जागांवर विजय मिळाला. भाजपनेही चार जागांवर विजय मिळविला. गेल्या वेळच्या तुलनते राष्ट्रवादी कॉंग्रेसला आठ जागा अधिक मिळाल्या; मात्र बहुमत नसल्याने सत्तेची चावी आता भाजपकडे राहणार असल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषदेच्या 55 गटांसाठी निवडणूक घेण्यात आली. मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी (ता.23) पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक 26 जागांवर विजय मिळविला. कॉंग्रेसने 13, शिवसेनेला 11, भाजपला 4, तर एक जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. गेल्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीला आठ जागा अधिक मिळाल्या; तर कॉंग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागा गमवाव्या लागल्या. भाजपने चार जागांवर विजय मिळवित गेल्या वेळेपेक्षा दोन जागा अधिक मिळवल्या. 

या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या कुन्हाळी (ता. उमरगा) गटातून शिवसेनेचे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण पाटील यांचा पराभव झाला. त्यांचा कॉंग्रेसचे प्रकाश आष्टे यांनी पराभव केला. शिवसेनेसाठी हा निकाल धक्कादायक ठरला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबा उर्फ केशव पाटील (शिवसेना) हे तुरोरी (ता. उमरगा) गटातून पराभूत झाले. कॉंग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण हे अणदूर गटातून तर आमदार बसवराज पाटील यांचे चिरंजीव शरण पाटील आलूर गटातून विजयी झाले. सांजा गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांचे चिरंजीव आदित्य गोरे पराभूत झाले. त्यांचा शिवसेनेचे कैलास पाटील यांनी पराभव केला. उस्मानाबाद, कळंबमध्ये यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला गेल्या वेळच्या तुलनेत मोठे यश मिळाले आहे. 

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला 18 जागा मिळाल्या होत्या. तुलनेत यंदा राष्ट्रवादीला जास्तीच्या जागा मिळाल्या असून, शिवसेना आणि कॉंग्रेसला काही जागा गमवाव्या लागल्या आहेत. 

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस मतदान झाले आहे. उस्मानाबाद पंचायत समिती राष्ट्रवादीने राखली आहे. 24 पैकी 16 जागा कॉंग्रेसला मिळाल्या. तुळजापूर पंचायत समिती कॉंग्रेसने राखली आहे. याठिकाणी 18 पैकी 10 जागांवर कॉंग्रेसला विजय मिळाला आहे. लोहारा पंचायत समितीवरही कॉंग्रेसची सत्ता येणार आहे. येथे आठपैकी सहा जागांवर कॉंग्रेसला विजय मिळाला. परंडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळविले आहे. येथे 10 पैकी सात जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. उमरगा पंचायत समितीत मात्र त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. येथे 18 पैकी कॉंग्रेसने नऊ जागांवर, भाजपने तीन जागांवर विजय मिळविला आहे. 

वाशी तालुक्‍यात तीन गट आहेत. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एका गटावर विजय मिळाला तर पंचायत समितीच्या सहा गणांपैकी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी दोन गणांमध्ये विजय मिळाला आहे.

Web Title: #VoteTrendLive NCP wins in Osmanabad