गरवारे क्रीडा संकुलाला पाणीटंचाईचे चटके

आदित्य वाघमारे
सोमवार, 27 मार्च 2017

एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या गरवारे क्रीडा संकुलाला आता पाणीटंचाईचे चटके बसायला लागले आहेत. कंत्राटदाराने वेळेत मैदान तयार केले; मात्र महापालिकेचा अद्याप पाणी साठवण हौद तयार झाला नसल्याने मैदान अडचणीत आले आहे.

औरंगाबाद - एक कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या गरवारे क्रीडा संकुलाला आता पाणीटंचाईचे चटके बसायला लागले आहेत. कंत्राटदाराने वेळेत मैदान तयार केले; मात्र महापालिकेचा अद्याप पाणी साठवण हौद तयार झाला नसल्याने मैदान अडचणीत आले आहे.

मोठा गाजावाजा करून औरंगाबाद शहरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गरवारे क्रीडा संकुलाला आता पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. मैदानात हिरवळ कायम राहावी म्हणून तयार करण्यात आलेली स्प्रिंकलर यंत्रणा सज्ज असली तरी त्या यंत्रणेला पाणीपुरवठा करणाऱ्या हौदाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मैदानावर एक कोटी पाच लाख रुपये खर्च करण्यात येत असून, त्यात गरवारे क्रिकेट स्टेडियममध्ये नव्याने खेळपट्ट्या तयार करणे, मैदानाच्या वरील कडक झालेला मातीचा थर काढून त्यात नव्याने मातीची भरती करणे, लॉन लागवड करणे आणि या मैदानाला पाणी देण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा तयार करण्याच्या कामाचा समावेश होता. या यंत्रणेला पाणीपुरवठा करणाऱ्या एक लाख लिटर क्षमतेचा हौद तयार करण्याचे काम महापालिकेकडे होते. 13 डिसेंबरला सुरू करण्यात आलेले हे काम 15 एप्रिलपर्यंत संपविण्याचे कंत्राटदाराने ठरविले होते. त्यानुसार मैदान तयार झालेही; पण आवश्‍यक असलेला पाण्याचा हौद तयार झालेले नाही. त्याच्यामुळे पाणी आणून आणि त्याची साठवण करण्यासाठी अनेक अडचणींचा सध्या सामना करावा लागत आहे.

हाताने मारावे लागते पाणी
गरवारे क्रिकेट स्टेडियमच्या लॉनसाठी सध्या टॅंकरने पाणी मागविले जात आहे. पाणी साठवण करण्यासाठीची यंत्रणा तयार होत नसल्याने कामगार रात्रीतही अनेकदा पाण्याच्या उपलब्धतेनुसार मैदान भिजवितात. त्याच्यासाठी लांबलचक पाईप वापरावे लागतात आणि ते वापरून मैदान समान प्रमाणात भिजविणे अवघड जात आहे. त्याच्यामुळे मैदानातील गवत कमी-अधिक प्रमाणात उगवले तर मैदान शोभून दिसणार नाही.

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदान 15 एप्रिलपर्यंत तयार करण्याचे आपण सांगितले होते. गवताची लागवड झाली आहे, स्प्रिंकलर तयार आहेत. हौद नसल्याने पाणी देणे अवघड जात आहे. पाणी साठविण्याचा हौद तयार झाला तर फायदा मैदानाला होणार आहे.
- नदीम मेमन (आंतरराष्ट्रीय क्‍युरेटर तथा कंत्राटदार)

Web Title: Water drought in Garware Stadium