पखरूडकरांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

टॅंकर सुरू करण्याची मागणी - पंचायत समितीकडे प्रस्ताव

ईट - पखरूड (ता. भूम) गावाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिना सुरु झाला आणि टंचाईचा प्रश्न तीव्र बनत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी शासकीय नळ योजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ फिरावे लागत आहे.

सार्वजनिक विहीर कोरडी पडल्यामुळे आठ दिवसांपासून गावाला पाणी नाही. हातपंप कोरडे झाले आहेत. अनेकजण आपल्या शेतातून बैलगाडीने पाणी घेऊन येत आहेत. कामधंदा सोडून फक्त पाण्यामध्येच दिवस जात आहे. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. ग्रामसेवकास पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने गावासाठी पाणी टॅंकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे मंगळवारी (ता. दोन) दाखल केला. परंतु अद्यापही टॅंकर सुरू झाले नाही. पाहणी करण्यासाठी कोणी अधिकारी पखरूडकडे फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी रानोमाळ पायपीट सुरूच आहे.

गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शेतातून पाणी घेऊन यावे लागत आहे. पाण्यामध्येच आमचा संपूर्ण दिवस जात आहे.
- उत्तम चव्हाण, ग्रामस्थ, पखरूड

पखरूड येथे टॅंकर सुरू करावा, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने पंचायत समिती कार्यालयास सादर केला आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. लवकरात लवकर टॅंकर सुरू करावे.
- काकासाहेब चव्हाण, पंचायत समिती सदस्य, भूम