दुष्काळ सुरू झाला की, योजना बंद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

तालुक्यातील नद्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधरा नदी पात्रात नाल्याच्या ठिकाणी असल्यामुळे पुराच्या पाण्याने बंधारे भरून जातात. त्यामुळे या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता कमी हाेते. या बंधाऱ्यातील व पाझर तलावातील गाळ काढून खोली व रुंदी वाढविणे आवश्‍यक आहे

अर्धापूर - ओलिताखाली क्षेत्र असलेल्या अर्धापूर तालुक्यात योग्य नियोजनाअभावी तालुक्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यातील अठरा गावातील २३ बोअरवेल अधिग्रहण करावे लागले आहे. तर पाणीपुरवठा योजना, जलस्रोत आटल्यामुळे बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील नदी नाल्यांना पाणी सोडले तरच या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतात. पाणी बंद झाले की, या योजना बंद पडतात.

अर्धापूर तालुक्याचे बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली येते. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प व पूर्णा प्रकल्पाचे पाणी तालुक्यात येत असल्यामुळे ओलिताचे क्षेत्र जास्त आहे. असे असले तरी पाण्याचा अमर्याद उपसा पाण्याच्या शोधात येणारी जमिनीची चाळणी, पाणी आडवा पाणी जिरवा ही फक्त घोषणाच राहते, बंधाऱ्यात व तलावात साचलेला गाळ व पाण्याच्या नियोजनाअभावी पाणी पळून जात आहे. पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.

अर्धापूर तालुक्यातील अठरा गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाचे २४ विंधन विहिरी अधिग्रहीत केल्या असून नागरिकांची तहान भागवली जात आहे. यात वाहेदपूर वाडी, लोणी (खुर्द), शेलगाव (बुद्रूक), बामणी, सावरगाव, निजामपूर वाडी, भोगाव, लहान, देगाव, कुऱ्हाडा, डौर, येळेगाव, शहापूर, दाभड, कलदगाव, अमरापूर, देळूब (खुर्द), गणपूर, खैरगाव या गावांचा समावेश आहे. तसेच काही गावांतील प्रस्ताव पंचायत समितीकडे आले अाहेत. तालुक्यातील नद्यांवर बंधारे बांधण्यात आले आहेत. हे बंधरा नदी पात्रात नाल्याच्या ठिकाणी असल्यामुळे पुराच्या पाण्याने बंधारे भरून जातात. त्यामुळे या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता कमी हाेते. या बंधाऱ्यातील व पाझर तलावातील गाळ काढून खोली व रुंदी वाढविणे आवश्‍यक आहे. तसेच पावसाने पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंड’ व ‘तनिष्का’ महिला व्यासपीठाने पुढाकार घेऊन बारसगाव बंधाऱ्याचे काम केले आहे. या कामासाठी पुढाकार व लोकसहभागाची गरज आहे.

तालुक्याला पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्यात आला असून तालुक्यातील अठरा गावांतील २४ बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करावे, असे आवाहन तहसीलदार अरविंद नरसीकर यांनी केले आहे