पाणीपुरवठ्याचे होणार ‘डायग्नॉस्टिक’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

औरंगाबाद - शहरात पाण्याच्या वितरणासाठी असलेल्या ८०० किलोमीटरपैकी ८० टक्के पाइपलाइनचे आयुष्य संपले असून, या संपूर्ण व्यवस्थेचे ‘डायग्नॉस्टिक’ करावे लागणार असल्याचे मुंबईतील जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अधिकारी डॉ. संजय दशसहस्रे यांनी मंगळवारी (ता. २९) सांगितले. 

औरंगाबाद - शहरात पाण्याच्या वितरणासाठी असलेल्या ८०० किलोमीटरपैकी ८० टक्के पाइपलाइनचे आयुष्य संपले असून, या संपूर्ण व्यवस्थेचे ‘डायग्नॉस्टिक’ करावे लागणार असल्याचे मुंबईतील जीवन प्राधिकरणाचे निवृत्त अधिकारी डॉ. संजय दशसहस्रे यांनी मंगळवारी (ता. २९) सांगितले. 

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या विनंतीवरून श्री. दशसहस्रे मंगळवारी शहरात आले. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले, आयुक्त डॉ. विनायक, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल, हेमंत कोल्हे, एमआयटीचे प्रा. प्रशांत अवसरमल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर पत्रकरांसोबत बोलताना डॉ. दशसहस्रे म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. सध्या येणारे पाणी कुठे जाते, कोणता व्हॉल्व्ह किती वेळ चालू राहतो, यापासून बारकावे तपासावे लागणार आहेत. एक प्रकारची ही ‘अँजिओप्लॅस्टी’ असेल. पाणी वितरण करणाऱ्या जवळपास ८० टक्के पाइपलाइनचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे पाइपलाइन फुटण्यासह इतर तक्रारीत वाढ होत आहे. सध्या असलेल्या ८०० पैकी ५६२ किलोमीटर पाईप सिमेंटचे आहेत. ४० किलोमीटर आरसीसीचे, तर २८ किलोमीटर पीयूसी पाइपलाइन असल्याचा दावा त्यांनी केला. जायकवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या पंपाचे आयुष्य संपले आहे. त्यामुळेच वीजबिल जास्त येते. हे पंप बदलले तर वीजबिल कमी होईल आणि उपसाही वाढू शकेल, असे दशसहस्रे यांनी स्पष्ट केले.

माझा प्रामाणिक प्रयत्न 
या वेळी डॉ. निपुण विनायक म्हणाले, सकाळी नहरीचे अभ्यासक डॉ. रहेमान शेख यांच्यासोबत चर्चा केली. जुने स्रोत बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. कमी खर्चात पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सक्षम कशी होईल, यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याने निश्‍चितपणे दिशा मिळेल, मात्र यश किती येईल, हे सांगता येत नाही. सध्या करण्यात येणाऱ्या प्रयत्नानुसार सहा महिन्यांत फरक पडेल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: water supply diagnostic