पाणचक्की हे जगातील सर्वोत्तम अभ्यास केंद्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - पाणचक्की हे  काळचे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते. येथील ग्रंथालय आशिया खंडातील सर्वांत मोठे ग्रंथालय होते. अनेक हस्तलिखिते स्वतः राजा-महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत. त्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे. अनेक लिखितांना सोन्याचा मुलामा आहे. पाणचक्कीच्या अशा अनेक पैलूंवर रविवारी (ता. २१) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. 

औरंगाबाद - पाणचक्की हे  काळचे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते. येथील ग्रंथालय आशिया खंडातील सर्वांत मोठे ग्रंथालय होते. अनेक हस्तलिखिते स्वतः राजा-महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत. त्याला तीनशे वर्षांचा इतिहास आहे. अनेक लिखितांना सोन्याचा मुलामा आहे. पाणचक्कीच्या अशा अनेक पैलूंवर रविवारी (ता. २१) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. 

शहरातील अनेक महिन्यांपासून खंडित झालेली हेरिटेज वॉकची परंपरा रविवारी पुन्हा एकदा सुरू झाली. शहरवासीयांना ऐतिहासिक वारशांची माहिती व्हावी, यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी आणि डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम पुन्हा सुरू केला. त्याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रविवारी पाणचक्कीत हजेरी लावली. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे डॉ. शिवकांत बाजपेयी, डॉ. बीना सेंगर, अजय ठाकूर, प्रदीप देशपांडे आदींची उपस्थिती होती. पाणचक्की हे स्थळ केवळ सुफी संतांची भूमी नाही, तर जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक केंद्र होते. येथे असलेली एक लाख पुस्तके जगाच्या अनेक कोपऱ्यांमध्ये राहणाऱ्या अभ्यासकांना आकर्षित करीत होती. यात उर्दू, संस्कृत, फारशी आदी भाषांतील अनंत विषयांची पुस्तके होती. निजामाने आपली राजधानी हैदराबादकडे ही पुस्तके नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा रेल्वेचे डबे भरून ही पुस्तके रवाना करण्यात आली होती, असे डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले. या ग्रंथालयातील अनेक हस्तलिखिते रविवारी पाणचक्की येथील कर्मचारी हाफीज अब्दुल जलील यांनी खुली केली होती. यामुळे अनेकांना शहरातील हा दुर्मिळ वारसा पाहण्याची संधी मिळाली. 

सर्वसामान्यांसाठी उभारली नहर
अरबस्तानातील देशांमध्ये नहरी मोठ्या प्रमाणात असल्या तरी त्या सर्वसामान्यांसाठी फार कमी उपयोगी पडत. बाबाशाह मुसाफिर आणि बाबाशाह पिलंगपोष हे बुखारा येथून औरंगाबादेत आले. 

या दोघांकडे येणाऱ्या भक्तांचा ओढा वाढला. त्यातून येथे नहर उभारण्याची संकल्पना बाबाशाह मुसाफिर यांचे शिष्य बाबाशाह मेहमूद यांना सुचली. सुरवातीला एक छोटी मशीद आणि एक विहीर असलेला पाणचक्कीचा हा भाग १७४४ मध्ये नहरीमुळे समृद्ध झाला. याचा फायदा झाला तो येथे अध्ययनासाठी, धार्मिक कारणासाठी येणाऱ्यांना, अशी माहिती दुलारी कुरेशी यांनी दिली. 

एमटीडीसीने बोध घ्यावा 
औरंगाबाद शहरात सुरू असलेला हेरिटेज वॉकचा चांगला उपक्रम ऐन डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आला. पण, औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीने आयोजित या हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जमलेल्या गर्दीने हे दाखवून दिले की असे कार्यक्रम शहराच्या पसंतीस उतरतात. लोक आपल्या परिवारासह या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे कारणे देऊन लोकोपयोगी कार्यक्रम ‘बाद’ करणाऱ्यांनी यातून बोध घ्यावा, अशी चर्चा शहरवासीयांमध्ये रंगली होती. 

नहर-ए-अंबरीला  लागले पंधरा महिने
औरंगाबाद शहराचे वैभव असलेली नहर-ए-अंबरी तयार करण्यासाठी अवघ्या पंधरा महिन्यांचा अवधी लागला. नागरिकांची गरज लक्षात घेऊन मलिक अंबर यांनी ही संकल्पना आपल्या राजापुढे मांडली. पण तत्कालीन अन्य तुर्की सरदारांनी याला विरोध केला आणि हे शक्‍य नसल्याचे सांगितले. पण मलिक अंबरने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत अवघ्या पंधरा महिन्यांत दोन लाख रुपये खर्च करून नहर-ए-अंबरी उभारली असल्याचे रफत कुरेशी यांनी सांगितले. 

बाबाशाह मुसाफिर आणि चौकातील बाजार    
शहराच्या सिटी चौक भागात असलेला बाजार तसा जुना. या चौकातून बाबाशाह मुसाफिर निराधारांसाठी कापड खरेदी करीत आणि येथून तयार केलेले नानसुद्धा ते पाणचक्कीत आणत. त्यामुळे येथे असलेल्या निराधारांना आणि अनाथांना अन्न-वस्त्र मिळत असे. बाबाशाह मुसाफिर यांचे भक्तगण वाढत गेल्याने येथे अनेक इमारती नंतर उभ्या राहिल्या.

पाणचक्की नव्याने पाहिली  
डॉ. पुरुषोत्तम भापकर (विभागीय आयुक्त, औरंगाबाद) ः औरंगाबादेत ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अनंत इमारती आणि पाऊलखुणा आहेत. पाणचक्कीबाबत यापूर्वी ऐकले होते आणि काही भाग पाहण्यातसुद्धा आला होता. पण, ही वास्तू नव्याने पाहण्याची संधी रविवारी आपल्याला मिळाली. शहराचे महत्त्व वाढवणाऱ्या अनेक वास्तू आजही आहेत. ज्यांचे जतन केले जाऊ शकते. ते करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. ‘कितना बह गया, कितना रह गया... जरा संभालकर ए इन्सान, कही पानी प्यासा ना रह जाये’ असे होऊ नये म्हणून नहरींचे पाणी कायम राहावे यासाठी पाणी अडवले आणि जिरवले जायला हवे. त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा.  

ऐतिहासिक वास्तू ध्यानी ठेवून विकास व्हावा  
डॉ. शिवकांत बाजपेयी (अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) ः औरंगाबाद शहराच्या प्रत्येक पावलावर ऐतिहासिक वारसा आहे. विकासकामांत तो हरवून जाता काम नये. शहराचा विकास आराखडा तयार करताना या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व कायम ठेवून तो तयार करायला हवा. मलिक अंबर या हौशी माणसाने आपल्या शहराची मुहूर्तमेढ रोवली आहे. या जागेचे महत्त्व टिकवणे शहरवासीयांची जबाबदारी आहे.