वॉटरगन बंद, प्राण्यांना कूलरचा गारवा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

औरंगाबाद - तापमान चाळीस अंशांपर्यंत पोचले असल्याने सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची कासावीस वाढली आहे. त्यांना हायसे वाटावे म्हणून प्रशासनाने वाघ, बिबटे, साप यांच्यासाठी कूलर सुरू केले आहेत. वाघांसाठी लाखो रुपये खर्च करून वॉटरगन लावण्यात आली होती; मात्र ती एकाच वर्षात बंद पडली. दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबटे, तरस यासारखे हिंस्र प्राणी आहेत. त्याचबरोबर नीलगायी, हरीण, कोल्हे, लांडगे असे सुमारे दीडशे  वन्यजीव आहेत. या प्राण्यांना उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा त्रास सहन करावा लागतो. वाघांसाठी तीन ठिकाणी पिंजरे असून, त्यात हौद बांधून पाणी सोडण्यात येते. असे असले तरी वातावरणात गारवा निर्माण करण्यासाठी दरवर्षी कूलर लावण्यात येतात. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. शनिवारी ३९ अंश एवढे तापमान नोंदविले गेले. त्यामुळे गेल्या आठवड्यातच दहा कूलर सुरू करण्यात आले आहेत. वाघ, बिबट्यांचे पिंजरे व सर्पालयात हे कूलर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्राण्यांसाठी आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. गतवर्षी लाखो रुपये खर्च करून दोन वॉटरगन लावण्यात आल्या होत्या. या गनद्वारे पाण्याचे फवारे वाघांचे वास्तव्य असलेल्या भागात सोडले जात होते. त्यामुळे या भागातील तापमान कमी होण्यास मदत होत होती; मात्र एकाच वर्षात वॉटरगन बंद पडल्या. 

यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष 
उन्हाळा सुरू होताच प्राणिसंग्रहालय विभागाने वॉटरगनची मोटार बंद पडली असून, ती बदलून देण्यात यावी, अशी मागणी यांत्रिकी विभागाकडे नोंदविली आहे; मात्र विभागाचे कर्मचारी प्राणिसंग्रहालयात येऊन फक्त भेटी देऊन जात आहेत. अद्याप वॉटरगन दुरुस्त करण्यात आलेली नाही. 

Web Title: Watergun Closed Cooler for animals