जलवाहिनीच्या एका कामात पाच ठिकाणी दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

दोन तासांचा शटडाउन आठ तासांवर, शुक्रवारी दुपारनंतर होणार पाणीपुरवठा

दोन तासांचा शटडाउन आठ तासांवर, शुक्रवारी दुपारनंतर होणार पाणीपुरवठा
औरंगाबाद - आठवडाभरापूर्वी 24 तासांच्या शटडाउननंतरही रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाजवळ लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी (ता. 16) दोन तासांचा शटडाउन घेतला होता. मात्र एक गळतीची दुरुस्ती करतानाच 1400 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर पाच ठिकाणी गळत्या लागल्याचे उघड झाल्याने या दुरुस्तीसाठी दोन तासांऐवजी तब्बल आठ तासांवर गेला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जलवाहिनीच्या गळत्या थांबविण्याचे काम पूर्ण झाले असून जलवाहिनी भरण्यासाठी सात ते आठ तासांचा वेळ लागणार असल्याने शुक्रवारी (ता.17) दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू होईल.

महानगरपालिकेच्यावतीने गेल्या आठवड्यातच 24 तासांचा शटडाउन जलवाहिनीच्या दुरुस्त्या केल्या. यावर सहा लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चही करण्यात आला. त्यामुळे तीन एमएलडी पाणी वाढल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी, दुसरीकडे एकाच आठवड्यात 1400 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर पाच ठिकाणी गळती आढळून आल्या. यातूनही तीन एमएलडीच्या जवळपास गळती होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे एक दिवसाचा खंड घेणे आवश्‍यक असल्याने गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून शटडाउन घेऊन दुरुस्तीला सुरवात करण्यात आली. जायकवाडीच्या नवीन पंपहाऊस जवळ मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले. या एकाच ठिकाणी दिवसभरात दोन एमएलडीपेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रेल्वेस्टेशन परिसरात दोन ठिकाणी तर नक्षत्रवाडीतील साठवण टाकीच्या परिसरात दोन ठिकाणी, अशा चार ठिकाणी गळती असल्याचे दुरुस्तीदरम्यान निदर्शनास आले. यातून सुमारे एक एमएलडीपेक्षा जास्त पाणी वाया जात असल्याने त्यांच्या दुरुस्तीचे दिवसभर काम करण्यात आले. जायकवाडीजवळ यांत्रिकी विभागाचे प्रमुख यु. जी. शिरसाट व त्यांच्या पथकाने दुरुस्ती केली. शाखा अभियंता सुहास जोशी यांच्यासह 6 कर्मचाऱ्यांनी नक्षत्रवाडीजवळ तर उपअभियंता के. पी. धांडे व तीन कर्मचाऱ्यांनी मजुरांसह रेल्वेस्टेशन उड्डाणपूल परिसरात गळतीच्या दुरुस्तीचे काम केले.

Web Title: waterline repairing