एव्हरेस्टवीर रफिकच्या पदोन्नतीचे काय झाले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

औरंगाबाद - नैसर्गिक संकटांमुळे दोनवेळा माघार घ्यावी लागूनही तिसऱ्यांदा शारीरिक आपत्तीवर जिद्दीने मात करून रफिक शेखने एव्हरेस्ट सर केले. या घटनेला शुक्रवारी (ता. 19) एक वर्ष पूर्ण झाले.

पोलिस दलातील प्रमोशन तर सोडाच; पण त्याच्या मोहिमेचा खर्च उचलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही अजून प्रत्यक्षात उतरलेली नाही.

औरंगाबाद - नैसर्गिक संकटांमुळे दोनवेळा माघार घ्यावी लागूनही तिसऱ्यांदा शारीरिक आपत्तीवर जिद्दीने मात करून रफिक शेखने एव्हरेस्ट सर केले. या घटनेला शुक्रवारी (ता. 19) एक वर्ष पूर्ण झाले.

पोलिस दलातील प्रमोशन तर सोडाच; पण त्याच्या मोहिमेचा खर्च उचलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणाही अजून प्रत्यक्षात उतरलेली नाही.

महाराष्ट्र पोलिस दलातील पहिला एव्हरेस्टवीर ठरलेल्या शेख रफिकचे देशभर कौतुक झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, बिग बी अमिताभ बच्चन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी तर रफिकच्या एव्हरेस्ट मोहिमेचा खर्च सरकारतर्फे उचलण्याची घोषणाही केली होती. पोलिस दलातील जवानाच्या या अत्युच्च कामगिरीबद्दल त्याच्या बढतीचा प्रस्ताव औरंगाबादच्या पोलिस अधीक्षक कार्यालयाने राज्य सरकारकडे पाठवला. त्यालाही आता बराच काळ लोटला.

एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणाऱ्या मराठवाड्यातील या पहिल्याच वीराने सलग तीनवेळा आर्थिक एव्हरेस्टवर मात केली. घरची साधारण परिस्थिती असूनही समाजातून मिळालेले आर्थिक पाठबळ, नातेवाइकांची मदत, पोलिस पतपेढी आणि वैयक्तिक कर्जही घेतले होते. मित्रपरिवारानेही त्याला बरीच रक्कम कर्जाऊ दिली. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली. एव्हरेस्ट उतरताना कोसळलेल्या आपत्तीत अचानक करावा लागलेला हेलिकॉप्टरचा खर्च पुण्याच्या गिर्यारोहकांनी तात्कालिक वेळेचे भान ओळखून उचलला. मोहिमेतील विजयाला एक वर्ष लोटले तरीही हा कर्जाचा आणि परतफेडीचा डोंगर त्याच्या डोक्‍यावर कायम आहे.

जळगावचा महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याला दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नोकरीचे आश्‍वासन दिले होते. या महिन्यातच त्याला पोलिस दलात उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. तब्बल बारा वर्षांपासून पोलिस दलात सेवा बजावणाऱ्या रफिकला मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार सरकारी मदत मिळाली, तर या जिद्दी गिर्यारोहकाच्या पंखांत नवनवे विक्रम रचण्याचे बळ येईल, अशी अपेक्षा शहरातील गिर्यारोहकांतून आणि रफिकच्या चाहत्यांमधून व्यक्त होत आहे.