काटेरी चमच्याने पत्नीचा खून

Jyoti-Shinde
Jyoti-Shinde

औरंगाबाद - पत्नीच्या पोटात पतीने काटेरी चमच्याने खोलवर भोसकून त्यानंतर तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २५) पहाटे तीनच्या सुमारास मुकुंदवाडीतील महालक्ष्मीनगरात घडला. गंभीर जखमी पत्नीला घरासमोरील नाल्यात ढकलून पती पसार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती शिंदे (वय ४०, रा. महालक्ष्मी चौक, महालक्ष्मीनगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे, तर बाळासाहेब शिंदे (वय ५८) असे संशयित पतीचे नाव आहे. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा बारावीत तर लहान मुलगा दहावीत शिकतो. घटनेबाबत पोलिसांना लहान मुलाने माहिती दिली. त्यानुसार, ‘‘आई व पप्पांचे नेहमी विविध कारणांवरून वाद व्हायचे. सोमवारी (ता. २४) रात्री नऊच्या सुमारास आई व पप्पा यांच्यात भांडण झाले. त्यानंतर मी जेवण करून झोपलो. रात्री तीननंतर आई जोरात ओरडल्याचा मला आवाज आला. मी खडबडून उठलो त्यावेळी पप्पा आईला मारत होते. त्यांनी आईच्या पोटात काटेरी चमचासदृश वस्तू खुपसली. जिवाच्या आकांताने आई घराबाहेर पळाली. मी पप्पांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु हिसका देत ते बाहेर गेले. त्यांनी पुन्हा आईचा गळा दाबला व नंतर तिला नाल्यात ढकलून दिले. मी आईला वाचविण्यासाठी नाल्याकडे जाताच ते घरात आले व बॅग भरून पळून गेले.’’ या घटनेनंतर ओम रडत-रडत रस्त्यावर आला, गस्तीवरील पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी त्याला रडण्याचे कारण विचारले असता, त्याने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. संशयित पतीचा पोलिस शोध घेत आहेत. तपास उपनिरीक्षक राहुल भदरगे करीत आहेत.

पती संशयी
बाळासाहेबचा पत्नी ज्योतीवर संशय होता. सोमवारी रात्री घरी आल्यानंतर त्याने स्कूटरचे किलोमीटर तपासले. दहा ते वीस किलोमीटर स्कूटर फिरविल्याचे लक्षात येताच त्याने पत्नीशी वाद घातला. भांडण वाढल्याने वैभव मित्राकडे झोपायला गेला, तर ओम घरीच होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com