सरकारविरोधात आंदोलन करणार : हिरालाल राठोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

फडणवीस, मोदी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद करण्याचे आदेश काढले आहेत. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना बंद केली. सरकारने सर्वच घटकांची निराशा आणि फसवणूक केली आहे.

बीड : फडणवीस, मोदी सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक विकास महामंडळ बंद करण्याचे आदेश काढले आहेत. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना बंद केली. सरकारने सर्वच घटकांची निराशा आणि फसवणूक केली आहे. या विरोधात भटके - विमुक्तांमधील विविध ११४ जाती सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.
भटक्या-विमुक्तांची जगण्याची पारंपरिक साधने, बैलगाडी, कोंबडा, दोन शेळ्यांसह मोर्चात लोक सहभागी होतील. 

भटक्क्या विमुक्तांच्या एका गोफणीच्या दगडात दोन पोलिस आडवे करण्याची ताकद असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड म्हणाले. बुधवारी (ता. २५) पत्रकार परिषदेत राठोड बोलत होते.

पोलिसांना मारण्याच्या गोष्टीचे तुम्ही समर्थन करता का, या प्रश्नावर पोलिसांनी सोलापूरला मोर्चात गोळीबार केल्याचे राठोड म्हणाले. भटका - विमुक्त समाज संघर्षशील आणि ताकदवान आहे. पुराणापासून ते इतिहासात या समाजातील व्यक्तींच्या कतृत्व आणि शौर्याचे दाखले असल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकार गोर - गरिबांच्या तोंडात माती घालत आहे. आर. आर. पाटील यांच्या पुढाकाराने सुरु झालेली वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना या सरकारने बंद केली. या समाजातील गोरगरिबांची मुले शिकत असलेल्या आश्रम शाळांना निधी नाही. 

सर्वसामान्यांच्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच्या योजनाही सरकारने बंद केल्याचा आरोप हिरालाल राठोड यांनी केला. ऐन हंगामात वीज जोडण्या तोडल्या. भटक्या - विमुक्तांसह सर्वच घटकांमध्ये या सरकाच्या विरोधात रोष आहे. सामान्यांच्या खात्यावर १५ लाख रुपयांची फसवणी घोषणा करुन केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने सत्ता मिळविली.

Web Title: will do Agitation against Government says Hiralal Rathod