सेक्‍स रॅकेट चालवित असल्याच्या संशयावरून महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

देहविक्रय करण्यासाठी दबाव टाकत एका बावीस वर्षाच्या मुलीला वसमत बस स्थानकावर मारहाण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला सेक्‍स रॅकेट चालवित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे.

वसमत (हिंगोली) - देहविक्रय करण्यासाठी दबाव टाकत एका बावीस वर्षाच्या मुलीला वसमत बस स्थानकावर मारहाण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित महिला सेक्‍स रॅकेट चालवित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे वसमत शहरात खळबळ उडाली आहे.

वसमत बसस्थानकावर मंगळवारी 22 वर्षाच्या मुलीला एक महिला मारहाण करत होती. प्रत्यक्षदर्शिनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेसह मुलीलाही ताब्यात घेतले. पीडित मुलीने पोलिस निरिक्षक अशोक मैराळ यांना संपूर्ण प्रकार सांगितला. शोभाबाई (वय 35, रा. सखोजी नगर, नांदेड) या महिलेने लग्न लावून देण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला नांदेडवरून वसमतमध्ये आणले होते. मात्र, प्रत्यक्षात लग्न लावून देण्याऐवजी तिच्यावर देहविक्रयासाठी दबाव टाकण्यात येत होता. एका युवकासोबत जाण्यासाठी शोभाबाई तिच्यावर दबाव टाकत होती. त्यास नकार दिल्याने बसस्थानकावरच तिला मारहाण करण्यात आली. वसमत शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत हे प्रकरण नांदेड पोलिसांकडे वर्ग केले आहे.

शोभाबाई मुलींना फूस लावून देहविक्रय करण्यासाठी भाग पाडत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.