मातेसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - दोन चिमुकलींसह आईने विषारी रसायन घेतले. ही घटना महालपिंप्री (ता. औरंगाबाद) येथे शनिवारी (ता. एक) सकाळी सातच्या सुमारास घडली. उपचारादरम्यान तिघींचाही रविवारी (ता. दोन) सकाळी मृत्यू झाला. 

औरंगाबाद - दोन चिमुकलींसह आईने विषारी रसायन घेतले. ही घटना महालपिंप्री (ता. औरंगाबाद) येथे शनिवारी (ता. एक) सकाळी सातच्या सुमारास घडली. उपचारादरम्यान तिघींचाही रविवारी (ता. दोन) सकाळी मृत्यू झाला. 

नीता सतीश भोळे (वय २२, रा. महालपिंप्री) असे आईचे तर दिव्या (वय-चार), दीप्ती (वय-दोन) अशी मृत मुलींची नावे आहेत. नीता यांचा चार वर्षांपूर्वी सतीश भोळेशी विवाह झाला होता. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तिने दिव्या व दीप्तीला जवळ घेतले. त्यांना विषारी रसायन पाजून स्वत:ही पिले. तिघी अत्यवस्थ झाल्याचे समजताच नातेवाइकांनी त्यांना घाटीत दाखल केले; परंतु शनिवारी मध्यरात्रीनंतर दिव्याचा मृत्यू झाला. पाठोपाठ रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दीप्तीचा मृत्यू झाला. दोन मुलींच्या मृत्यूनंतर जीवनमरणाच्या दारात असलेल्या आईनेही जगाचा निरोप घेतला. तिघींच्या मृत्यूची बातमी समजताच, नीताच्या माहेरच्या कुटुंबीयांनी घाटीत गोंधळ घातला. आपल्या मुलीच्या व नातीच्या मृत्यूला सासरची मंडळी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक मीना तुपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माहेरच्या मंडळींची समजूत घालीत त्यांना शांत केले.  या घटनेनंतर नीताच्या वडिलांनी चिकलठाणा पोलिस ठाण्यात धाव घेतली. सासरची मंडळी नीताचा छळ करीत होती. तिला वारंवार त्रास दिल्यामुळे तिने आत्महत्येचा मार्ग पत्करला, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले. त्यानुसार, याप्रकरणात पती सतीश भोळे, सासूसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक मीना तुपे करीत आहेत.