महिलांची नांदेड जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी!

महिलांची नांदेड जिल्हापरिषद अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी!

नांदेड : मिनी मंत्रालयाचे म्हणजेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेक आजी - माजी आमदार, खासदारांच्या सुना तसेच काही ठिकाणी पत्नी देखील इच्छुक उमेदवार आहेत. पन्नास टक्के महिलांना आरक्षण असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलाराज सुरू झाले असून त्यात नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही महिलेसाठीच आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. 


राजकारण करत असताना सत्तेची खुर्ची ही आपल्याच घरात म्हणजे मुलगा, मुलगी, सूनबाई किंवा नातेवाईकांच्याच ताब्यात राहिली पाहिजे, यासाठी आटापिटा करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. इतकेच नाही तर मंत्रीपद तसेच आमदार, खासदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यक्ष व इतर महत्वाची पदे उपभोगली तरी आरक्षण असतानाही आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, यासाठी सध्या आजी माजी लोकप्रतिनिधींचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत.


नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजताच तालुक्‍यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणामुळे बराच गोंधळ झाला आहे. कोणाची सोय झाली तर कोणी नवीन मतदारसंघाच्या शोधात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे कॉंग्रेस त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम यासह इतर पक्षही त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी सुटल्यामुळे आत्तापासूनच रस्सीखेच सुरु झाली आहे. 


मंत्री, आमदार, खासदार राहिलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर रामतीर्थ (ता. नायगाव) मधून इच्छुक असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर यांच्या सूनबाई डॉ. विशाखा टाकळीकर इच्छुक आहेत. माजी मंत्री, माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांच्या सूनबाई मधुमती कुंटुरकर या कुंटुर (ता. कुंटुर) सर्कलमधून इच्छुक आहेत. मधुमती कुंटुरकर या पंचायत समितीच्या सभापती राहिल्या आहेत. 
कॉंग्रेसचे मुखेडमधील माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी सुशिला बेटमोगरेकर या चांडोळा (ता. मुखेड) मधून इच्छुक आहेत तर शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांच्या सूनबाई भाग्यश्री विक्रम साबणे या देखील एकलारा (ता. मुखेड) येथून इच्छुक आहेत. माजी सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा मुक्रमाबादमधून (ता. मुखेड) इच्छुक आहेत. त्याचबरोबर हदगावचे कॉंग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मातोश्री देखील निवडणुक रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 


शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या कंधार तालुक्‍यातील बहाद्दरपुरा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने हा गट सध्या रडारवर आहे. येथून कोण आणि कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले नसले तरी ज्येष्ठ नेते व आमदार व खासदार राहिलेले डॉ. केशवराव धोंडगे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार ईश्‍वरराव भोसीकर यांच्या सूनबाई एकमेकांच्या विरोधात लढण्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून चित्ररेखा गोरे यांचे नाव चर्चेत असून, या वेळी बहाद्दरपुऱ्यातील लढत सर्वांचे लक्ष वेधून घेणार हे मात्र नक्की. 
पूर्वीचा सर्वसाधारण बहाद्दरपुरा गट या वेळी सर्वसाधारण महिलेसाठी तर पूर्वीचा सर्वसाधारण महिला फुलवळ गट या वेळी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. यामुळे जिल्हापरिषद सदस्य प्रा. पुरुषोत्तम धोंडगे आणि वर्षा भोसीकर यांची अडचण झाली आहे. अडचणीवर मात करत पुरुषोत्तम धोंडगे यांनी पत्नी मनीषा धोंडगे यांना बहाद्दरपुरातून मैदानात उतरवण्याचा निर्णय जाहीर केला. फुलवळ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या पत्नी विद्यमान जिल्हा परिषद सदस्या वर्षा भोसीकर बहाद्दरपुरातूनच नशीब आजमावतील, असे चित्र आहे. श्री. भोसीकर यांनी तसे संकेतही दिले आहेत. यामुळे बहाद्दरपुरात या वेळी दोन माजी आमदाराच्या सुना दोन हात करतील, असे चिन्हे आहेत. सध्या तरी बहाद्दरपुरा गटातून वर्षा भोसीकर, मनीषा धोंडगे आणि चित्ररेखा गोरे यांचे नाव चर्चेत आहेत. शेवटच्या क्षणी आणखी कोण-कोण मैदानात उतरतात त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com