सरदार घराण्याच्या संग्रहालयाचे स्वप्न अधुरे 

सरदार घराण्याच्या संग्रहालयाचे स्वप्न अधुरे 

औरंगाबाद - औरंगाबाद हे संग्रहालयांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकेल, इतका पुराणवस्तूंचा ठेवा शहरात अनेक व्यक्तींकडे विखुरलेला आहे. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे हिरूभाऊ जगताप. स्वातंत्र्यचळवळीपासून शहराच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या हिरूभाऊंच्या संग्रहालयाच्या अधुऱ्या स्वप्नाविषयी थोडेसे... 

सरदार घराण्यात जन्मलेले घरंदाज व्यक्तिमत्त्व म्हणून हिरूभाऊंच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाची पहिल्या भेटीतच छाप पडे. त्यांचे पूर्वज आनंदराव जगताप हे दौलताबादचे किल्लेदार होते. नवाबपुऱ्यात त्यांचा भव्य दुमजली वाडा. हिरूभाऊंच्या तीन-चार पिढ्यांचा इतिहास दाखवेल, अशी ही एक शाही वास्तू असल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात येते. त्यांच्या पूर्वजांच्या वापरातील ऐतिहासिक वस्तू आणि त्यांनी देशाटनातून जमवलेला मौल्यवान खजिना या वाड्याच्या भिंतीकोनाड्यांतून पाहायला मिळतो. सैनिकी वेषातील त्यांच्या पूर्वजांच्या तसबिरी आणि मौल्यवान चित्रांनी वाड्याच्या भिंती सजल्या आहेत. विविध शस्त्रास्त्रे आणि त्यांनी केलेल्या शिकारीच्या ट्रॉफीज लावलेल्या आहेत. आपल्या वाड्याच्या दोन मजल्यांवरच त्यांनी या वस्तूंची अशी शिस्तबद्ध मांडणी केली, की एखाद्या संग्रहालयातूनच फिरत असल्याचा भास व्हावा. 

महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आठ वर्षे सदस्य असताना हिरूभाऊंनी अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या होत्या. राजकारणात व्यग्र असतानाही अनेक वस्तूंचा जाणीवपूर्वक संग्रह केला. मराठवाड्यातील कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब पवार यांनी या वस्तूंचे संग्रहालय व्हावे, यासाठी पाठपुरावा केला; पण ते होऊ शकले नाही. सध्या हिरूभाऊंच्या पत्नी आणि या वाड्याच्या मालकीण असलेल्या सुशीलाबाई जगताप या साऱ्याची निगुतीने जपणूक करतात. 

शिकारीची परंपरा, कातडी ठेवा 
पणजोबांपासून सर्वजण उत्तम शिकारी असल्यामुळे तलवारी, बंदुका, सुरे आणि शिकार केलेल्या जनावरांची कातडी त्यांच्याकडे आहेत. हरीण, काळविटांच्या कातडीचे दुर्मिळ गालिचे आहेत. गिनीज बुकात नोंद असलेल्या लांबीपेक्षा केवळ एक इंचाने कमी असलेले वाघाचे कातडे आणि सांबरशिंगांची ट्रॉफी त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय मगरीच्या पाठीच्या कातड्याची पर्स, सांबरशिंगांचा टीपॉय, सोन्याचांदीत मढवलेली वाघनखांची बटणेही आहेत. 

शेरवानी, पदके आणि तसबीर 
सैनिकांचे भरजरी पोशाख, शेरवान्या, पादत्राणे, पगड्या, बेल्ट्‌स, बटन्स आणि घराण्यातील सर्वांना लष्कराकडून मिळालेले मेडल्स जपून ठेवलेले आहेत. आजोबा सरदार बहादूर गोविंदराव जगताप यांनी शंभर वर्षांपूर्वी चीनमधून आणलेल्या वस्तू, छत्रपती शिवाजी महाराजांची कराचीतील ब्रिजवासी ऍण्ड कंपनीने पेन्ट करून घेतलेली आणि जर्मनीत सप्तरंगात प्रिन्ट केलेली दुर्मिळ तसबीर त्यात आहे. चीनमधील बुद्धमूर्ती, पंचम जॉर्ज राजाराणीची छबी असलेले कप, जुने व्हिक्‍टोरियन फर्निचर, बिदरी हुक्का, अत्तरदाणी, गुलाबदाणी, अडकित्ते आणि अशा शेकडो वस्तू, डोळे तृप्त होतील असा प्राचीन नाण्यांचा खजिना त्यांच्याकडे आहे. 

थोरामोठ्यांच्या भेटी 
पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, पंडित गोविंद वल्लभपंत, इंदिरा गांधी, ग्यानी झैलसिंग, शंकरदयाळ शर्मा, संजय गांधी, मोरारजी देसाई यांचा सहवास हिरूभाऊंना लाभला. त्यांच्या ऐतिहासिक वास्तूत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, अशा अनेक थोर व्यक्ती येऊन गेल्या. तसेच नवाब जैनियार जंग, राजा किशनप्रसाद यांचे जावई कर्नल अहमदखॉं मददगार नाजीम, यशवंतराव मोहिते, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, बडे गुलाम अली खॉं, बाबासाहेब पुरंदरे, अभिनेते सुनील दत्त, मीनाकुमारी, अशोककुमार यांनीही हा संग्रह आवर्जून पाहिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com