दमदार पावसाने यंदा बाजारात उत्साह

दमदार पावसाने यंदा  बाजारात उत्साह

दसरा-दिवाळीनिमित्त उलाढालीमध्ये २५ टक्‍के वाढ अपेक्षित

औरंगाबाद - मोठ्या विश्रांतीनंतर बाजारपेठेला प्रतीक्षा असते ती दसरा-दिवाळीची. यानिमित्त बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. यंदा दमदार पावसामुळे बाजाराला सकारात्मक संकेत दिलेला आहे. त्यामुळे रिअल इस्टेट, वाहन, इलेक्‍ट्रॉनिक आणि सोने-चांदी बाजारात २५ टक्‍के वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

याबाबत बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले, की मराठवाडा गेली तीन वर्षे दुष्काळाने होरपळला. त्यामुळे शहरी भागातील बाजारपेठा नोकरदार वर्गामुळे तरल्या होत्या. मात्र, तालुका आणि ग्रामीण भागातील बाजारपेठा डबघाईस आल्या होत्या. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही लक्ष पावसाकडे लागलेले होते. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे यंदा पावसानेही जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी, नोकरवर्ग आणि व्यापारीदेखील सुखावले. तब्बल तीन वर्षांनंतर बाजारपेठेमध्ये दसऱ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात उलाढाल अपेक्षित आहे. विशेषत: रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यावसायिक, बॅंका आणि वित्तीय संस्थेतील चांगल्या ताळमेळीमुळे दसऱ्याच्या दिवशी एक हजाराहून अधिक गृहप्रवेश अपेक्षित आहे. साधारणत: दहा ते वीस लाख रुपयांदरम्यानच्या रो-हाऊस आणि फ्लॅटला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 
शेंद्रा-बिडकीन, सातारा, देवळाई आणि हर्सूल भागांतील गृहप्रकल्पाला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. शिवाय या भागातील किंमतीही आवाक्यात असल्याने नागरिकांचीही पसंतीी मिळत आहे. त्या पाठोपाठ वाहन बाजारामध्ये पाच ते दहा लाख रुपयांदरम्यान असलेल्या वाहनांना विशेषत: नोकरवर्गाकडून प्राधान्य दिले जात आहे. यंदा चांगले पीकपाणी आणि पगारवाढीमुळे २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाहनविक्री होण्याचा अंदाज आहे. ग्राहकांसाठी खास उदाहरणार्थ फ्री इन्शुरन्स, कॅश डिस्काऊंट, मोफत ॲक्‍सेसरीज आणि कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त सूट देण्यात आल्याने चारचाकी वाहन घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो. चारचाकीमध्ये व्हाईट, सिल्व्हर, ग्रे, रेड आणि ब्लू कारला अधिक मागणी आहे. दुचाकी आणि चारचाकी मिळून तीन हजार वाहने रस्त्यावर उतरतील, असा अंदाज आहे.  विशेषतः तरुणाई जास्त सीसीच्या दुचाकी गाड्यांना पसंती देत आहे. त्यामुळे यंदा इतर गाड्यांसोबतच १३५ च्यावर सीसी असलेल्या वाहनांनाही चांगली मागणी राहील, असा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे.

दरम्यान, सोन्याचे दर सध्या काही प्रमाणात कमी झाल्याने सोने खरेदी यंदा दसऱ्याला वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. दसऱ्याला अनेकजण सोने खरेदी करतात. सोन्याचे दर कमी झाल्याने सराफा बाजारात यंदा चांगली उलाढाल होणार आहे.

सुटीच्या दिवशीही बॅंका सुरू

चारचाकी शक्‍यतो वाहनकर्ज करूनच घेण्याचा आपल्याकडे कल आहे. कंपनी आणि बॅंकांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंत ग्राहकांना फायदा होईल. त्याशिवाय मुहूर्तावर वाहन खरेदी करता येण्यासाठी शनिवारी आणि रविवारीही बहुतांश बॅंकांचा वाहन कर्ज विभाग सुरू होता. सहाजिकच दसऱ्याला किमान एक हजार ते बाराशे कार रस्त्यावर येतील, असा विश्‍वास समीर वाळवेकर यांनी व्यक्‍त केला.

इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठा तेजीवर स्वार

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठा तेजीवर स्वार झालेल्या आहेत. मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोओव्हन, वॉटर कुलर आदी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू मुहूर्तावर खरेदी करण्याला महिला वर्गाचे प्राधान्य असते. त्याशिवाय खासगी बॅंकांनी शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज घेऊन या वस्तू खरेदी करण्याची सुविधा दिल्याने ग्राहकांचा फायदाच आहे. यंदा इलेक्‍ट्रॉनिक बाजारात घसघशीत ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित असल्याचा विश्‍वास व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी व्यक्‍त केला.

घरांनाही चढताहेत रंग

दिवाळी-दसऱ्यानिमित्त बहुतांश घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. घराच्या रंगांवर घरात राहणाऱ्या व्यक्‍तींचे स्वभावगुण तयार होतात, असे मानले जाते. घरातील रंगांमुळे वातावरण प्रफुल्लित राहण्यासाठी प्रत्येकवेळी काही ना काही नवा प्रयोग केला जातो. यंदा वॉटर कलर बेस तंत्रज्ञानाने तयार केलेल्या रंगांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. हा रंग लवकर सुकतो, वास येत नाही, फिनिशिंग आणि शायनिंग दर्जेदार, टिकाऊ आणि इको फ्रेंडली असल्याने प्राधान्य दिले जाते. यंदा बिल्डर्सकडून ५०, तर सर्वसामान्य ग्राहकांकडून ५० टक्‍के रंगांना मागणी आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा तीस टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उलाढाल होईल, अशी माहिती शिवशंकर स्वामी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com