पासपोर्ट कार्यालयासाठीची "यिन'ची मोहीम फत्ते 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - औरंगाबादसह मराठवाड्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या पासपोर्ट कार्यालयासाठी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कने मोहीम हाती घेतली होती. दोन वर्षांपासून सुरू असलेली ही मोहीम फत्ते झाली असून हे कार्यालय औरंगाबादेत सुरू करण्यात येणार आहे. 

औरंगाबाद - औरंगाबादसह मराठवाड्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनलेल्या पासपोर्ट कार्यालयासाठी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कने मोहीम हाती घेतली होती. दोन वर्षांपासून सुरू असलेली ही मोहीम फत्ते झाली असून हे कार्यालय औरंगाबादेत सुरू करण्यात येणार आहे. 

औरंगाबादसह मराठवाड्यातील नागरिकांसाठी पासपोर्ट कार्यालयाचा प्रश्‍न अत्यंत जिव्हाळ्याचा बनला होता. पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज ऑनलाईन करता येत असला, तरी त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक वेळेला मुंबई गाठावी लागत होती. मराठवाड्यातील लोकांची सोय व्हावी आणि औरंगाबादेत हे कार्यालय सुरू करण्याची मागणी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात "यिन'च्या वतीने करण्यात आली होती. या मागणीसाठी संपूर्ण मराठवाड्यातून चार हजार सह्या घेण्यात आल्या होत्या. याशिवाय वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवरांनी या मोहिमेत सही करून आपला सहभाग आणि पाठिंबा दर्शवला होता. यात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, कुलगुरू प्रोफेसर बी. ए. चोपडे, आमदार इम्तियाज जलील आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहभाग नोंदवला होता. या मोहिमेत सोशल मीडियाच्या माध्यमातून रणशिंग फुकण्यात आले होते. "यिन' सदस्यांनी पेजच्या माध्यमातून आणि वैयक्तिक प्रोफाईलच्या साथीने या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्या आवाहनाला साथ देत मराठवाड्यातील तरुण आणि अन्य नागरिक या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी निवेदने देण्यात आली होती. "यिन'च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ती मांडण्यात आली होती. मागणीचे गांभीर्य लक्षात घेत "यिन'च्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते. त्यानुसार औरंगाबाद शहरात हे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. "यिन'ची ही मागणी मान्य झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: yin victory campaign