दानवेंच्या घरासमोर तरुणांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल वापरलेले अपशब्द म्हणजे माझ्याही बापाचा अपमान आहे. त्यांनी खासदारकीसह प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आंदोलनात सहभागासाठी राज्यभरातील तरुण येणार आहे.
- हनुमंत पवार, आंदोलनकर्ते

भोकरदन - तूर खरेदीप्रश्‍नी शेतकऱ्यांप्रति अनुद्‌गार काढणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी माफी मागावी, पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांच्या येथील निवासस्थानासमोर काही तरुणांनी शुक्रवारी (ता.12) सकाळपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा मिळत असून दुपारी आणखी काही तरुणांनी त्यात सहभाग घेतला.

जालना येथील कार्यक्रमांत तुरी संदर्भात कार्यकर्त्यांशी बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल असभ्य शब्दप्रयोग केला होता. त्याविरुद्ध राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. गुरुवारी (ता. 11) निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांनी सारवासावरीचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या वक्‍तव्याबद्दल राज्यात संतप्त भावना कायम आहेत. त्यांच्या येथील निवासस्थानासमोर हनुमंत पवार (उस्मानाबाद) मानस पगार (नाशिक) निखिल कदम (परभणी), अभय टाकसाळ (औरंगाबाद) या तरुणांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले. दुपारी दोनच्या सुमारास इतर जिल्ह्यांतील आणखी पाच तरुण आंदोलनात सहभागी झाले. राज्यभरातील शेकडो तरुण येथे येणार असल्याची माहिती हनुमंत पवार यांनी दिली. दानवे यांनी शेतकऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, शेवटचा दाणा शिल्लक असेपर्यंत तूर खरेदी सुरू ठेवावी, तुरीचे चुकारे सात दिवसांत द्यावे, तूर विक्रीसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, जाचक वीज भारनियमन रद्द करावे, स्वामिनाथन आयोग अंमलात आणावा आदी मागण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ते म्हणाले.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल वापरलेले अपशब्द म्हणजे माझ्याही बापाचा अपमान आहे. त्यांनी खासदारकीसह प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आंदोलनात सहभागासाठी राज्यभरातील तरुण येणार आहे.
- हनुमंत पवार, आंदोलनकर्ते.

Web Title: youth agitate against Danve