युवक कॉंग्रेसने दाखविले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

उस्मानाबाद - शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पार्डी (ता. वाशी) येथे काळे झेंडे दाखविले. यामुळे तेथे काही काळ गोंधळ उडाला. घोषणा देत काळे झेंडे दाखविणाऱ्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.

जलयुक्त शिवार आणि अन्य विकासकामांच्या आढाव्यासाठी फडणवीस जिल्हा दौऱ्यावर होते. पार्डी येथील शेतकरी बालाजी चौधरी यांच्या शेतातील शेततळ्याची त्यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहपालकमंत्री महादेव जानकर, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी होते. शेततळ्याच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री वाहनाकडे निघाले असता युवक कॉंग्रेसचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष उमेशसिंह राजेनिंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी खिशातून काळे झेंडे काढून, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविले.

शेततळ्यास्थळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी होते. मात्र, कार्यकर्त्यांनी अचानकपणे अगदी मुख्यमंत्र्यांच्या जवळ येऊन काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील पहिल्याच कार्यक्रमात हा प्रकार झाल्यामुळे भूम तालुक्‍यातील हिवरा, आरसोली येथील कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.