बीड येथे युवकाचा धारधार शस्त्राने खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

बीड - शहरातील जुनाबाजार भागातील रहिवासी असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. शाहबाज तन्वीर खान हे बुधवारी आपल्या बुलेटवर कटकटपुरा भागातून कारंजा भागाकडे जात असताना तोंडावर रूमाल बांधून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कारंजा भागात त्यांच्यावर चाकूने वार केले. पोटात, छातीवर अनेक वार झाल्याने शाहबाज तन्वीर खान गंभीररीत्या जखमी झाले. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच मोठ्या प्रमाणावर जमाव जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान मृत शाहबाज तन्वीर खान हे हेल्थ क्‍लब चालवीत होते. त्यांचा खून कोणी व का केला, हे मात्र समजू शकले नाही.