उभारीसाठी तरुणांची धडपड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद- अवघ्या 42 सेकंदाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. आई-वडील, बहीण-भावांचे छत्र हरपलेले असतानाही दुःख गिळून परिस्थितीवर मात करीत स्वतःला सावरण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, ही भावना मनात घेऊन या भागातील तरुण धडपड करीत असल्याचे चित्र आहे. या धडपडीत अनेक तरुण यशस्वीही झाले आहेत. 

उस्मानाबाद- अवघ्या 42 सेकंदाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यात अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले. आई-वडील, बहीण-भावांचे छत्र हरपलेले असतानाही दुःख गिळून परिस्थितीवर मात करीत स्वतःला सावरण्यासाठी काहीतरी केलेच पाहिजे, ही भावना मनात घेऊन या भागातील तरुण धडपड करीत असल्याचे चित्र आहे. या धडपडीत अनेक तरुण यशस्वीही झाले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील 30 सप्टेंबर 1993 च्या प्रलयकारी भूकंपाला 23 वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपामध्ये सर्वाधिक हानी उमरगा, लोहारा तालुक्‍यांतील गावांची झाली. भूकंपात काही कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाला. काही कुटुंबातील मुले, मुली वाचल्या. अशी मुले, मुली दुःख दूर सारून आता स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत. त्यापैकीच सूरज सुधीर हावळे (वय 26, रा. जेवळी, ता. लोहारा). भूकंप झाला त्या वेळी त्याचे वय तीन वर्षे होते. भूकंपाच्या वेळी तो आजोळी भोसगा येथे होता. भूकंपात सूरजचे आई, वडील, दोन भावांचा मृत्यू झाला. काय घडले हे कळण्याचे वय नसलेल्या सूरजला जसजशी समज येऊ लागली, तशी भूकंपाने दिलेल्या वेदनांची माहिती मिळत गेली. आजी, आजोबाने त्याचा सांभाळ केला. त्याने डीएड केले. सध्या खासगी क्‍लासेस घेऊन तो कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. 

असे अनेक तरुण आता दुःख सारून परिस्थितीशी झुंज देत यश मिळवित आहेत. सूरज हावळे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. भूकंपग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळत असल्याने काहींना सरकारी नोकरी मिळाली, काहींनी मोठ्या शहरात जाऊन व्यवसाय सुरू केला, काहींनी वडिलोपार्जित शेती करून अंधारलेल्या आयुष्यात पुन्हा उजेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे शेती करणे, शिक्षण घेऊन नोकरी मिळविणे, व्यवसाय करणे, यावरच अनेकांनी भर देत मार्गक्रमण केले. 

स्पर्धा परीक्षेच्या तयारीत... 
भूकंपाच्या वेळी पाच ते 10 वयोगटातील मुले आता 28 ते 33 वर्षांची झाली आहेत. यातील काहींना नोकरी मिळाली, काहीजण नोकरीच्या शोधात, काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. परिस्थितीवर मात करीत पुढे जात असताना भूकंपाच्या त्या आठवणी मात्र अद्यापही या भागात ताज्याच असल्याचे चित्र आहे.