मी नाही, तर सौभाग्यवती... पण निवडणूक लढणारच

मी नाही, तर सौभाग्यवती...  पण निवडणूक लढणारच

औरंगाबाद - जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांकडून राजकीय रणधुमाळीस सुरवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष श्रीराम महाजन वगळता इतर सर्वच दिग्गजांना विविध प्रवर्गाच्या आरक्षणाचा फटका बसलेला असल्याने त्यांनी बाजूच्या गटातून चाचपणीस सुरवात केली आहे. अनेकांनी ‘मी नाही तर सौभाग्यवती’ असे म्हणत गटात तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनीही गटांचे आरक्षण चाळत कोणत्या गटातून कोणता उमेदवार मिळू शकेल, यासाठी नावांच्या चाचपणीस सुरवात केली आहे. 

वर्ष २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ६२ गट तयार करण्यात आले आहेत. पंचायत समितीचे १२४ गण आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ६० गट, पंचायत समितीचे १२० गण होते. आता औरंगाबाद, पैठण आणि वैजापूर तालुक्‍यांत जिल्हा परिषदेचा एक गट वाढला असून, कन्नड तालुक्‍यातील एक गट कमी झालेला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख सात हजार ४६७ आहे. नवीन वर्षातील जिल्हा परिषदेत ६२ सदस्यांत पन्नास टक्के आरक्षणानुसार ३१ महिला सदस्या राहणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत महिलांचा बोलबाला राहणार आहे. 

जिल्ह्यात २२ लाख सात हजार लोकसंख्या
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे. जिल्ह्यात २२ लाख सात हजार ४६७ लोकसंख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीची (एस.सी.) दोन लाख ७२ हजार ९४९, अनुसूचित जमातीची (एस.टी.) एक लाख १८ हजार ७४१ लोकसंख्या आहे. या लोकसंख्येनुसारच नवीन तालुकानिहाय गट निर्माण करण्यात आलेले आहेत. २०१२ मध्ये ६० गट होते. मात्र, सातारा-देवळाई अगोदर नगरपंचायत, नंतर महापालिकेत आल्याने येथील दोन गट कमी झाले. सोयगाव, फुलंब्री नगरपंचायती झाल्याने येथील दोन गटही कमी झाले. 

३४ सर्वसाधारण गटासाठी चुरस
जिल्हा परिषदेत नवीन ६२ गटांत ३१ सदस्या महिला राहणार आहेत. जिल्हा परिषदेत एकूण ३४ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. त्यापैकी १६ महिला सदस्य राहतील. जिल्ह्यात सर्वाधिक चुरशी खुल्या प्रवर्गातील गटांसाठी राहणार आहेत. महिला खुला प्रवर्ग असला तरीही येथे दिग्गज राजकीय नेते आपल्या घरातील महिलेस उमेदवारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत.  

जिल्हा परिषद, पंचायत समितीत 
लोकसंख्येनुसार असेल गट, गण संख्या
तालुका    लोकसंख्या    जिल्हा    पंचायत
        परिषद गट    समिती गण

सोयगाव    १०५७२७    ३    ६
सिल्लोड    ३०१७३३    ८    १६
कन्नड    ३००२६०    ८    १६
फुलंब्री    १४४३४७    ४    ८
खुलताबाद    १०२५७९    ३    ६
वैजापूर    २७००७५    ८    १६
औरंगाबाद    ३४५८९९    १०    २०
पैठण    ३०६४३७    ९    १८

जिल्ह्यात लोकसंख्येची स्थिती

एकूण लोकसंख्या- २२०७४६७
एस.सी. लोकसंख्या- २७२९४९
एस.टी. लोकसंख्या- ११८७४१

जिल्हा परिषदेतील गट, आरक्षणाची स्थिती
एकूण गट- ६२
महिलांसाठी गट-३१
सर्वसाधारणमध्ये एकूण ३४ गट, त्यापैकी १६ गट महिलांसाठी
एस.सी.साठी ८ गट, त्यापैकी ४ महिलांसाठी
एस.टी.साठी ३ गट, त्यापैकी २ गट महिलांसाठी
ओबीसीसाठी १७ गट, त्यापैकी ९ गट महिलांचे.

बासष्ट गटांचे आरक्षण जाहीर

औरंगाबाद - जिल्हा परिषद गट आरक्षणाचा अध्यक्ष श्रीराम महाजन वगळता आजी - माजी सभापती, दिग्गज सदस्यांना चांगलाच फटका बसला. पुन्हा दुसऱ्या, तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक असलेल्या सदस्यांच्या गटांवर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिलांचे आरक्षण पडल्याने अनेक इच्छुकांना आता बाजूच्या गटातून नशीब अजमवावे लागणार आहे. तसेच काही सदस्यांना सर्वसाधारण गटातून आता महिलांना मैदानात उतरविण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 

बुधवारी (ता. पाच) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोलमारे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन देवेंद्र कटके यांच्या उपस्थितीत ६२ गटांची सोडत काढण्यात आली. यावेळी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विद्यमान अध्यक्ष श्रीराम महाजन तसेच जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. मिनी मंत्रालयात पुन्हा एन्ट्री मिळते की नाही हे सोडतीवर अवलंबून असल्याने सभागृहात प्रचंड गर्दी जमली होती. सुरवातीला थेट अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण ८ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्येही दिग्गजांना आपल्या गटावर आरक्षणामुळे पाणी सोडावे लागले. यानंतर थेट तीन अनुसूचित जमातीसाठी (एसटी) तीन गटांचे थेट आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये करंजखेडा, वाकला, शिऊर गटांचा समावेश आहे. 

ओबीसीचे दोन गट निवडले चिठ्ठ्यांनी
ओबीसी महिलेसाठी यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव असल्याने सर्वांचे लक्ष ओबीसी गटांकडे होते. ओबीसीसाठी एकूण १७ गट आहेत त्यातून थेट १५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आणखी दोन गटांसाठी चिठ्ठ्या टाकून त्यातून आरक्षण काढण्यात आले. हर्षा बनसोडे या मुलीच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यामध्ये लाडसावंगी, नागद गटाच्या चिठ्ठ्या निघाल्याने हे दोन्ही गट ओबीसीसाठी राखीव झाले. 

३४ गट सर्वसाधारणसाठी
जिल्हा परिषदेच्या ६२ गटांपैकी ३४ गट हे सर्वसाधारणसाठी होते. त्यात १६ गट हे महिलांसाठी असल्याने कोणत्या गटात महिलांचे आरक्षण होईल यासाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातून महिलांसाठी राखीव असलेले सोळा गट निवडण्यात आले. मात्र सर्वसाधारणमध्ये अनेक इच्छुक असलेल्या दिग्गजांचे गट महिलांसाठी राखीव झाले. महिलांसाठी चिठ्ठ्या टाकून काढण्यात आलेल्या गटात घाटनांद्रा, वडगाव कोल्हाटी (गट क्रमांक ५०), भवन, रांजणगाव शेणपुंजी, पिशोर, संवदगाव, जामगाव, गणोरी, वेरूळ, आपेगाव, बोरसर, शिल्लेगाव, उंडणगाव, करमाड, लासूर गाव, तुर्काबाद या गटांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्ष महाजन ठरले लकी
आरक्षणाचा जवळपास सर्वच दिग्गजांना फटका बसलेला असताना विद्यमान अध्यक्ष श्रीराम महाजन लकी ठरले. त्यांचा भराडी गट हा सर्वसाधारणसाठी राहील. ३४ सर्वसाधारण गटात १६ गट महिलांसाठी निवडले जाणार होते. त्यासाठी १९ गटांच्या चिठ्ठ्या टाकून १६ गट निवडण्यात आले. भराडी गट सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने श्रीराम महाजन यांना त्यांच्याच गटात पुन्हा नशीब अजमावण्याची संधी आहे. तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाऱ्या अनुराधा चव्हाण यांचा गणोरी गट हा सर्वसाधारण महिलेसाठी सुटला आहे. तसेच समाजकल्याण सभापती शीला चव्हाण यांच्यासाठी बिडकीन गट आता खुला आहे, तर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांचा पिशोर गटसुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी आहे. 
अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. आता या दिग्गजांना सर्वसाधारणमध्ये महिलांना मैदानात उतरवावे लागणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष दिनकर पवार यांचा गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. पूर्वी हा गट सर्वसाधारण होता. विद्यमान बांधकाम सभापतींचा सिल्लेगाव गटही सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. शिक्षण समिती सभापती विनोद तांबे यांचा विहामांडवा गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. माजी सभापती रामनाथ चोरमले यांचा आपेगाव गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. अनिल चोरडिया यांच्या गटाचे यंदा दोन तुकडे पडले; मात्र पहिल्या गटात अनुसूचित जाती तर दुसऱ्या गटात सर्वसाधारण महिलेचे आरक्षण पडले तसेच रांजणगाव शेणपुंजी गटसुद्धा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला. रामदास पालोदकर, दीपक राजपूत, ज्ञानेश्‍वर मोठे, बबन कुंडारे, सुनील शिंदे, शैलेश क्षीरसागर, संतोष माने, मनाजी मिसाळ, संभाजी डोणगावकर अशा सर्वच दिग्गजांचे गट एससी, एसटी, ओबीसी, महिलांसाठी राखीव झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे 
गट व त्यांचे आरक्षण
जिल्हा परिषद गट    त्यांचे आरक्षण     तालुका

फर्दापूर    ओबीसी    सोयगाव
आमखेडा    ओबीसी महिला    सोयगाव
गोंदेगाव    ओबीसी महिला    सोयगाव
अजिंठा    ओबीसी    सिल्लोड
शिवना    सर्वसाधारण     सिल्लोड
उंडणगाव    सर्वसाधारण महिला     सिल्लोड
घाटनांद्रा    सर्वसाधारण महिला    सिल्लोड
पालोद    अनु. जाती महिला    सिल्लोड
भराडी    सर्वसाधारण    सिल्लोड
अंधारी    सर्वसाधारण    सिल्लोड
भवन    सर्वसाधारण महिला    सिल्लोड
नागद    ओबीसी महिला    कन्नड
करंजखेडा    अनु. जमाती    कन्नड
चिंचोली लिंबाजी    सर्वसाधारण    कन्नड
पिशोर    सर्वसाधारण महिला    कन्नड
कुंजखेडा    ओबीसी     कन्नड
हतनूर    सर्वसाधारण    कन्नड
जेहूर    ओबीसी    कन्नड
देवगाव रंगारी    सर्वसाधारण    कन्नड
बाबरा    सर्वसाधारण    फुलंब्री
वडोद बाजार    सर्वसाधारण    फुलंब्री
पाल    सर्वसाधारण    फुलंब्री
गणोरी    सर्वसाधारण महिला    फुलंब्री
बाजारसावंगी    सर्वसाधारण    खुलताबाद
गदाना    ओबीसी    खुलताबाद
वेरूळ    सर्वसाधारण महिला    खुलताबाद
वाकला    अनु. जमाती महिला    वैजापूर
बोरसर    सर्वसाधारण महिला    वैजापूर
शिऊर    अनु. जमाती महिला    वैजापूर
सवंदगाव    सर्वसाधारण महिला    वैजापूर
लासूरगाव    सर्वसाधारण महिला    वैजापूर
घायगाव    सर्वसाधारण    वैजापूर
वांजरगाव    सर्वसाधारण    वैजापूर
महालगाव    सर्वसाधारण    वैजापूर
सावंगी    ओबीसी महिला    गंगापूर
अंबेलोहळ    अनु. जाती     गंगापूर
रांजणगाव शेणपुंजी    सर्वसाधारण महिला    गंगापूर
वाळूज बु.     अनु. जाती     गंगापूर
तुर्काबाद    सर्वसाधारण महिला     गंगापूर
शिल्लेगाव    सर्वसाधारण महिला     गंगापूर
नेवरगाव    सर्वसाधारण     गंगापूर
जामगाव    सर्वसाधारण महिला     गंगापूर
शेंदूरवादा    ओबीसी महिला    गंगापूर
लाडसावंगी    ओबीसी महिला    औरंगाबाद
गोलटगाव    अनु. जाती     औरंगाबाद
करमाड    सर्वसाधारण महिला    औरंगाबाद
सावंगी    अनु. जाती     औरंगाबाद
दौलताबाद    सर्वसाधारण     औरंगाबाद
वडगाव को. गट ४९    अनु. जाती महिला     औरंगाबाद
वडगाव को.गट ५०    सर्वसाधारण महिला     औरंगाबाद
पंढरपूर    सर्वसाधारण     औरंगाबाद
आडगाव बु.     ओबीसी     औरंगाबाद
पिंप्री बु.     ओबीसी     औरंगाबाद
बिडकीन    सर्वसाधारण    पैठण
आडूळ बु.     ओबीसी महिला    पैठण
पाचोड बु.        सर्वसाधारण    पैठण
विहामांडवा    ओबीसी महिला    पैठण
दावरवाडी    अनु. जाती महिला    पैठण
ढोरकीन    अनु. जाती महिला    पैठण
चितेगाव    ओबीसी    पैठण
पिंपळवाडी पिराची    ओबीसी महिला    पैठण
आपेगाव    सर्वसाधारण महिला    पैठण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com