जिल्हा परिषदेत शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

हिंगोली - जिल्हा परिषदेच्या येहळेगाव गवळी (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने अर्जित रजेचे देयक देण्याच्या कारणावरून बुधवारी (ता. 15) जिल्हा परिषदेत विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली - जिल्हा परिषदेच्या येहळेगाव गवळी (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने अर्जित रजेचे देयक देण्याच्या कारणावरून बुधवारी (ता. 15) जिल्हा परिषदेत विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिक्षक पी. जे. कल्याणकर यांचे 26 नोव्हेंबर 2016 ते आठ डिसेंबर 2016 या कालावधीतील अर्जित रजेचे देयक प्रलंबित आहे. याशिवाय फेब्रुवारीचे मासिक देयकही त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे ते अडचणीत सापडले. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी (ता.14) नांदापूर येथील केंद्रीय मुख्याध्यापकांना निवेदन दिले. मानसिक त्रास देण्याच्या हेतूने देयक तीन मार्चला कळमनुरी पंचायत समितीत दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. 17 व 18 फेब्रुवारीला करप्रणाली संदर्भातील कामासाठी नांदापूर, हिंगोली, कळमनुरी येथे गेलो होतो. यासंदर्भात मुख्याध्यापक एस. डी. मनवर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 20 फेब्रुवारीला कामासाठी कळमनुरीत तर 21 फेब्रुवारीला येहळेगाव येथे फेरमतदानामुळे शाळेत हजर झालो नाही. 22 फेब्रुवारीला शाळेत हजर झाल्यानंतर मुख्याध्यापक मनवर यांनी स्वाक्षरी करू दिली नाही. याबाबतची माहिती केंद्रीय मुख्याध्यापक डवरे यांना दिल्यानंतरही त्यांनी अनधिकृत गैरहजर असल्याचे सांगितले. या मानसिक छळाला कंटाळून श्री. कल्याणकर यांनी आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. आज ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दाखल झाले. सायंकाळी त्यांनी विषारी औषधाची बाटली तोंडाला लावली. उपस्थितांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे.

चौकशीचे आदेश
श्री. कल्याणकर यांची तक्रार, त्यांना अर्जित रजेचे देयक आतापर्यंत का देण्यात आले नाही, यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.