पैशाची कहाणी

पैशाची कहाणी

शांताबाई मला म्हणाल्या, ""महादूने तीस लाखांची जमीन घेतली, पण पैसे दिले नाहीत म्हणून आपण त्याच्यावर कोर्टात दावा केला. तो चिडला. मी गावी फाट्यावर एसटीची वाट पाहत एकटीच उभी होते. तिथे आला. म्हणाला, "माझ्यावर केस केलीस, पैसे तर मी देणार नव्हतोच. पण आता जमिनीचा ताबाही सोडणार नाही.' त्याने मला ढकलले, माझे डोके झाडावर आपटून खोक पडली. हाताचे हाड मोडले. पैशासाठी केवढा हा खोटेपणा हो!''

एकदा माझी मैत्रीण नीलिमा घरी आली. गप्पा मारताना म्हणाली, ""लग्न झाल्यावर मुंबईत आम्ही दोघे छोट्या भाड्याच्या खोलीत राहत होतो. मग मला घरापासून दूर असलेल्या ऑफिसमध्ये नोकरी लागली. ऑफिस जवळ जागा घेण्यासाठी पैसे नव्हते. माझी दोन्ही मुले लहान असताना असे रात्री उशिरा येण्याने मुलांसाठी जीव तळमळत असे, दुःख होई. हे सर्व बाबांना माहीत होते. त्यांना पैसे मागावेत हे माझ्या कधी मनात आले नाही. नंतर काटकसरीने पैसे वाचवून ऑफिसजवळ घर घेतले. आता सर्व मस्त चालले आहे. बाबा पंधरा दिवसांपूर्वी वारले. त्यांनी मृत्युपत्र केले आहे, त्यावरून कळले, की खूप वर्षांपासून त्यांच्याजवळ कोट्यवधी रुपये होते. माझ्या गरजेसाठी पैसे कर्ज म्हणून दिले असते तर? पण दिले नाहीत, का गं त्यांनी असं केलं?'' तिने ते मृत्युपत्र माझ्या हातात दिले, म्हणाली, ""आता मला या पैशाची गरज नाही! हे मला व ताईला पैसे का दिलेत, तर मृत्युनंतर माणूस पैसा बरोबर नाही नेऊ शकत म्हणून!'' आणि ती ओक्‍साबोक्‍शी रडू लागली.

एक जुना पक्षकार, ऑफिसमध्ये आला. म्हणाला, ""मला मृत्युपत्र बदलायचे आहे. माझ्या धाकट्या मुलाची बायको भांडकुदळ आहे, म्हणून त्यांना एक स्वतंत्र घर राहायला, तीन मोठ्या गाड्या व भाड्यापोटी येणारे प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये त्याला दिले. एक-दीड महिन्यापूर्वी तो खूप खोकत होता, म्हणून त्याला फॅमिली डॉक्‍टरांकडे नेले. ते म्हणाले, "दोन महिन्यांपूर्वीच तुमच्या सुनेला सांगितले, की यांची हृदय शस्त्रक्रिया करा. तिने सांगितले नाही?' मी लगेच त्याची शस्त्रक्रिया करून घेतली. तो आता बरा आहे. मधल्या काळात त्याच्या बायकोने तीनही गाड्या विकल्या. तिच्या आई-वडिलांना व दोन भावंडांना त्यांच्या गावाहून येथील घरात राहण्यास आणले. माझ्या मुलाला औषध न देता तो गेल्यावरची व्यवस्था करू लागली होती. आता तिला काही न देण्यासाठी मला मृत्युपत्र बदलायचे आहे.''

घरकाम संपवून बाई निघाल्या. त्यांना म्हटले, ""आमच्याकडील बदली कामाचा आजचा शेवटचा दिवस, पगार घेऊन जा. किती पैसे देऊ सांगा!'' ""नेहमीच्या बाईंना देता तेवढेच द्या.'' ""असं कसं! तुमच्यामुळे माझी मोठी अडचण दूर झाली, मला एवढे सर्व काम करायला जमले नसते. म्हणून म्हणते, किती पैसे ते सांगा.'' ""वहिनी, मी मनापासून सांगते. त्यांना देता तेवढेच द्या. पैसा काय कितीही मिळाला तरीही अजून हवाच असतो!''

आमच्या नेहमी काम करणाऱ्या बाई कामावर आल्या. त्यांना म्हटले, ""तुमचा पगार टेबलवर ठेवलाय. जाताना घेऊन जा.'' तर म्हणाल्या, ""नको, तो तुम्हीच ठेवा. पोरीच्या लग्नासाठी घेतलेले पैसे या महिन्यापासून लगेच फेडून घ्यायला लागा. वहिनी, मी तुमचे मन जाणते. पण पैसे कोणाकडून उधार घेतले की माझ्या मनात सारखे येते पैसे फेडायचे आहेत आणि मला झोप येत नाही. अहो, पैसाच मदत करतो, पैसाच भांडण लावतो. पटतंय ना तुम्हाला?''

झाडाचे नारळ काढायचे का म्हणून विचारायला आमच्याकडे एक माणूस आला. म्हटले, "किती पैसे घेणार?' त्याने या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले व तो बागेत शिरला. मी हाच प्रश्‍न त्याला तीन-चार वेळा विचारला. त्याने उत्तर दिले नाही. सरळ झाडावर चढून नारळ काढले. हा माणूस उत्तर देत नाही म्हणून त्याच्या हातावर पैसे ठेवू लागले. म्हणाला, ""एवढे कशाला? वीस-तीस द्या. अहो, माझ्या तोंडात दातसुद्धा नाहीत काही खायला. एवढे पैसे घेऊन काय करू?'' कसे बसे पन्नास रुपये घेतले आणि झपाझपा गेटच्या दिशेने जाऊ लागला. माझे डोळे भरून आले. ते पैशाच्या व्यवहारात फसविल्या गेलेल्या दुःखितांचे चेहरे आठविले म्हणून, की आजही पैशाइतकेच किंवा काकणभर माणुसकीला जपणारी थोडीतरी माणसे आहेत या समाधानाने हे माझे मलाच कळले नाही.

एकदा एक नातू म्हणाला, ""आजोबा, मी मोठेपणी कोण होऊ?'' आजोबा उत्तरतात, "हुशारीच्या जोरावर तू श्रीमंत होशीलच. तू उत्तम माणूसही हो. माणुसकीने वागल्यास सुखीही होशील. या मार्गावर तू सहज पुढे जाशील, कारण इकडे सहसा कोणी फिरकतही नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com