गीतेच्या सान्निध्यात

गीतेच्या सान्निध्यात

श्रृंगेरीला शारदाम्बासमोर गीतापठण करायला मिळावे, ही फार दिवसांची इच्छा होती. किंबहुना कुठे तरी ही इच्छा मनात असेल आणि मी गीता संथा घेतली. गीताधर्म कंठस्थ परीक्षा २०१०मध्ये दिली. त्यानंतर चार वर्षांनी श्रृंगेरीला श्रीमद्‌ शंकराचार्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले. मनावर प्रचंड दडपण होते. त्यामुळे परीक्षा सुरू असताना तीन वेळा चुकले म्हणून बाहेर पडावे लागले. पाटी कोरी व्हावी तसे माझे झाले आणि दुसऱ्या अध्यायानंतर मला नीट आठवेनाच. मनाशी निश्‍चय केला- येथे पुन्हा येऊन मी गीतेचे अठराही अध्याय म्हणणार. माझे गीतापठण चालू होतेच. मी जुलै २०१५ ते जुलै २०१६ या काळात ‘चकली विथ भगवद्‌गीता’ उपक्रम राबविला. म्हणजे तीन किलो चकली पीठ पूर्ण भाजणी भिजवून चकल्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण गीता म्हणायची. असे वर्षभर ५१ वेळा पाठ केले. म्हणजे १५१ किलो चकल्या केल्या. या उपक्रमातून ५१० रुपये बाजूला ठेवले होते. तेवढ्यात मुलगी-जावयाने स्मार्ट फोन भेट दिला. त्यात रमत गेले. पण अचानक जाणवले हे माझे ध्येय नाही. ध्येयपूर्तीसाठी फोन, टीव्ही, नातेवाईक, कार्यक्रम, प्रवचने सर्व बंद करून पुन्हा पठण सुरू केले. मी श्रृंगेरीपीठाला अर्ज पाठविला. चार दिवसांतच श्रृंगेरीपीठाकडून दूरध्वनीवर निरोप आला. मला २५ डिसेंबरला पुन्हा जायचे होते. माझ्या आनंदाला पारावार नाही राहिला. हातात फक्त एकवीस दिवस होते. ते तीन आठवडे झोपले नाही. त्याच काळात मी प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला एक हजार एकशे अकरा रुपये पाठविले. आपण आपल्या परीने समाजाचे काही देणे द्यावे म्हणून ही रक्कम पाठवली.

आताची श्रृंगेरी सहल कष्टाचीच झाली. अनेक अडचणी निघाल्यापासून पोचेपर्यंत; पण ती हिरवी वाट, प्रसन्न करणारी हवा व प्रवासात संपूर्ण गीता ऐकत जाणे या आनंदात कष्ट जाणवले नाहीत. प्रवासात थोड्या अडचणी आल्या, त्याही भगवंताने चुटकीसरशी सोडविल्या. परीक्षेच्या आदल्या रात्री आठ वाजता श्रृंगेरीत पोचलो, पावनस्थानच्या त्या मातीत एवढी ऊर्जा आहे की, प्रवासाचा शीण नाही वाटला. पहाटे आवरून शारदाम्बा मंदिरात गेले. खूप सुंदर असे देवीचे मंदिर आहे. लक्षदिव्यांची आरती पाहून मन तृप्त झाले होते. शारदाम्बापुढे बसून गीतेची तयारी केली. दुपारी दोन वाजता परीक्षा होती. तुंगभद्रा नदीचा पूल ओलांडून एका दगडी इमारतीच्या ओसरीवर परीक्षा होती. सभोवार हिरवा गालीचा, प्रसन्न वातावरण, पक्ष्यांचा मंत्रमुग्ध करणारा किलबिलाट, शेगावचा गजानन महाराजांचा आनंदसागर परिसर आणि श्रृंगेरीमठाचा संपूर्ण परिसर सारखाच आनंदसुख देणारा. नारळाची बाग, तसेच विविध फुलबागा. घोडे, वाघ, गाई सर्व आजूबाजूला. मागील वेळी एका भगिनीला वाघ दिसला होता. 

परीक्षा घेणारे पंडितजी अतिशय प्रसन्न मुद्रेने समोर बसले होते. विद्वत्तेचे तेज चेहऱ्यावर दिसत होते. परीक्षा सुरू झाली. आम्ही पुण्याच्या सहा जणी होतो. अठरा अध्यायापर्यंत कधी पोचलो समजलेच नाही; पण माझ्या नावापुढे पुन्हा तीन टिंबे आली आणि संपूर्ण महिनाभराची मेहनत व्यर्थ की काय वाटले. तसेच झाले. पण मी सावरले. परीक्षेत मी यशस्वी ठरले नसेन; पण मला अठरा अध्याय म्हणायला आले, ते स्वप्न पूर्ण झाले होते. अजिबात वाईट वाटले नाही. 

मी शंकराचार्य मंडपात आले. तेथील वातावरण शुद्ध पवित्र मनाला प्रसन्न करणारे. बक्षीस समारंभ सुरू झाला. मोठे शंकराचार्य प्रशस्तिपत्र देत होते. छोटे शंकराचार्य एखादा श्‍लोक मधूनच सांगून समोरच्या भगिनींची परीक्षा घेत होते. मी आशीर्वाद घेण्यास गेले. दोन्ही शंकराचार्यांना नमस्कार केला. म्हणाले, ‘‘मी यश नाही मिळवू शकले, तरीही मला आपणास एक श्‍लोक म्हणून दाखवायचा आहे.’’ त्यांनी होकार दिला. मी दुसऱ्या अध्यायातील श्‍लोक म्हटला,

कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्‍चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌।।

माझे स्वप्न साकार झाले. जे मला हवे होते, ते मिळाले. जर यश एका क्षणात मिळाले असते, तर वाटचाल खुंटली असती. मी गीता जन्मभर सुरूच ठेवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com