काश्‍मिरी माणसं

अंजली सुमंत मुळे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

काश्‍मिरी भूमीतील अशांतता ऐकून होते; पण इथल्या माणसांनी त्याची झळ अजिबात जाणवूही दिली नाही. काश्‍मीरने आम्हाला आमचा मुलगा सुखरूप दिलाच; पण आम्हाला खूप चांगली माणसेही भेटवली.

काश्‍मिरी भूमीतील अशांतता ऐकून होते; पण इथल्या माणसांनी त्याची झळ अजिबात जाणवूही दिली नाही. काश्‍मीरने आम्हाला आमचा मुलगा सुखरूप दिलाच; पण आम्हाला खूप चांगली माणसेही भेटवली.

लडाखवरून मुलगा परत येणार होता, त्याचदिवशी सकाळी नऊच्या सुमारास तो दूरध्वनी आला. विक्रांतला हृदयविकाराचा धक्का बसल्याने काश्‍मीरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. तो निरोप ऐकताच आमच्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. दोघेही पाच-सात सेकंद तरी एकदम निःशब्द होऊन एकमेकांकडे बघत राहिलो. मी भानावर आले ते माझ्याच रडण्याने. अश्रू आवरले. यांना म्हणाले, ""चला, आधी आपल्याला बॅंकेत जायला हवे.'' आम्ही बॅंकेत पोचलो, तेव्हा बॅंकेची वेळ संपलीच होती; पण बॅंकेतील माणसांनी माणुसकी दाखवून पैसे काढू दिले. लगेच विमान तिकीट आरक्षित करून आम्ही रात्रीच्या विमानाने दिल्लीत व तेथून काश्‍मीरला गेलो. सकाळी साडेसातला मुलाच्या वार्डमध्ये होतो. तेथील गंभीर परिस्थिती त्याला बघताच लक्षात आली. आमचे अवसान अजून गळून गेले.

आम्ही पोचल्याचे कळताच नजीरभाई आणि जुल्फीकारभाई यांनी धावत जाऊन तिथले डॉ. खालिद मोहोद्दीन आणि डॉ. मोहम्मद इरफान यांना माहिती दिली. ते लगेच आले आणि त्यांनी मुलाच्या गंभीर आणि गुंतागुंतीच्या तब्येतीची पूर्ण जाणीव आम्हाला दिली. ते म्हणाले, ""हमने हमारा काम पुरी मेहनत से किया है, अब सिर्फ आप दोनो की दुआ काम करेगी.'' हे ऐकल्यावर मी हुंदका आवरू शकले नाही. डॉक्‍टरांनी धीर दिला. म्हणाले, ""अब आप आए हैं ना? देखो मॉं का स्पर्श होते ही विक्रांत कैसे जाग जाएगा, मॉं के स्पर्श में यही तो जादू है, आप बिल्कूल टेन्शन नहीं लेने का, आपका बेटा रोता हुआ यहा आया है, आप कल-परसोही देखो, हॅंसते हुए वो आपके साथ घर जाएगा, ये हमारा वादा है आपको!'' त्यांच्या प्रत्येक शब्दांत आत्मविश्‍वास होता. शब्दाशब्दांत आपुलकीचा आणि माणुसकीचा गंध जाणवत होता.
शासकीय एसएमएचएस रुग्णालयात मुलाजवळ रात्रंदिवस किमान पाच ते सहा जण असायचे. वॉर्डबाहेर नजीरभाई आणि झुल्फिकारभाई आपले हाउसबोटचे, हॉटेलचे काम सोडून औषध, इंजेक्‍शन आणण्यासाठी धावपळ करायला तत्पर होते. पुढच्या काही दिवसांत आम्हाला तेथील लोकांच्या मनाचा मोठेपणा आणि त्यांची दिलदारी, माणुसकी याचा सतत अनुभव येत होता. वॉचमन, वार्डबॉय आणि अन्य रुग्णांचे नातेवाईकही किमान सहा-सात वेळा विचारून गेले, "आपको कुछ भी चाहिए, पैसा, कपडा, रहने की जगह, हमें बुलाना, निःसंकोच पैसे ले लेना,' काश्‍मीरमधील दहशतवाद, बंद, दगडफेक, गोळीबार, इथल्या लोकांची मानसिकता हेच ऐकून होतो. त्यानेच भीतीचा पगडा बसला होता; पण मुलाच्या अशा अचानक दुखण्याने तिथल्या खऱ्या माणसांची, तिथल्या मातीच्या सुगंधाची जवळून जाणीव झाली होती. त्यांच्या सहवासात मुलाच्या गंभीर दुखण्याची झळ आम्हाला अतिप्रखरतेने जाणवलीच नाही.

सर्वांच्याच बोलण्यात, वागण्यात फक्त सेवाभाव होता. बिलाल अहमद व सिस्टर रिफाल जराही न कंटाळता मुलाच्या सेवेला तत्पर असत. मी दुसऱ्या दिवशी मुलाला सारखे हाक मारून जागे करण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढ्यात डॉक्‍टर सकाळच्या पहिल्या राउंडसाठी आले. मुलाला तपासले आणि मिस्टरांच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्‍टर इरफान म्हणाले, ""मैं जीत गया और आप भी जीत गए.'' आम्हाला कळेना, हे काय म्हणतात. दुसरे डॉक्‍टर म्हणाले, ""हमने कहा था ना कल, बीस टक्का उम्मीद थी; लेकिन मॉं का हाथ लगते ही बंदा कल अस्सी टक्का ठीक हो जाएगा, सही हुवा आज. हमारे डॉक्‍टर इरफान की आखरी उम्मीद आपके बच्चे को जीवनदान दे गई!''
आता धोका टळला होता. मुलाच्या मित्राने सांगितले, "दोन दिवसांपूर्वी मुलाला ते रुग्णालयात घेऊन आले तेव्हा त्याला जोरदार झटका आला होता. येथे आणले तेव्हा पाहता पाहता हृदय थांबले. याच डॉक्‍टरांनी इलेक्‍ट्रिक शॉक ट्रीटमेंट करून मुलाच्या थांबलेल्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू केले होते.' डॉ. इरफान आमच्यासाठी जणू दैवत झाले. मी मुलाला व्हीलचेअरवरून वार्डमध्येच फेऱ्या मारत होते. तेवढ्यात एका विमानतळ अधिकाऱ्याच्या पत्नीने थांबून चौकशी केली, ""तुम्ही इकडचे दिसत नाहीत? काय झाले याला?'' जाताना पुन्हा तोच आपलेपणाचा आवाज, "आपको कुछ भी जरूरत हो, हमें बताना, ये लो हमारा कार्ड, इधर नजदीकही हमारा बंगला है, आप दोनों इधर आ जाना, सोने के लिए और खाने का क्‍या?' अगदी जवळच्या बहिणीप्रमाणे बोलत होती ही अनोळखी बाई. मी फक्त म्हणाले होते, "मैद्याच्या रोट्या नको वाटतात.' दुसरे दिवशी दहा-साडेदहाला त्या मॅडमनी चक्क मला आठ छान गव्हाच्या पोळ्या आणून दिल्या.
टचकन पाणी आले डोळ्यांत!