एक अनामिक भेट वेगाशी

download.gif
download.gif

साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी गरवारे कॉलेज मध्ये मी ग्रॅड्युएशनला होतो. बाईक जोरात चालवायची आणि कचकन ब्रेक मारायचा. गाडीवर स्टंट करायचे म्हणजे लोक आपल्याला वळून बघतात आणि आपल्याला "काय मस्त गाडी चालवतो'' म्हणतात असा गैरसमज मनामध्ये होता. त्या वेळी वडिलांनी नवीन बाईक घेऊन दिली होती. त्यामुळे माझी स्वारी अजूनच हवेत होती. 

एक दिवस मी पुण्याच्या नवी पेठ भागातून पत्रकार भवन जवळून बाईक भरधाव वेगाने चालवत गरवारे कॉलेजला जात होतो. अचानक एका पस्तिशीतल्या गृहस्थाने मला लिफ्टसाठी हाथ दाखवला आणि मी कचकन ब्रेक लावत गाडी थांबवली आणि त्या गृहस्थाला विचारले "कुठे जायचे आहे?" काही उत्तर देण्याआधी तो गृहस्थ माझ्या बाईकवर बसला आणि म्हणाला "मला भांडारकर रोडला जायचे आहे". मी गरवारे पर्यंत जात असल्याने तिथे सोडतो असे म्हणालो आणि गाडी सुरु केली. त्या गृहस्थाने"माझी ट्रेन आहे आणि मला उशीर झाला आहे तर तुम्ही कृपया मला भांडारकर रोडला सोडाल का अशी विनंती केली. मी माझी बाईक भरधाव वेगाने पळवायला सुरवात केली आणि थोडे अंतर पार केल्यावर माझा वेग पाहून तो गृहस्थ म्हणाला " माझी ट्रेन सुटली तरी चालेल पण तुम्ही गाडी हळू चालवा. मी ह्या वेगाच्या वेडापायी मृत्यूच्या दारातून परतलो आहे". मी कुतूहलाने त्यांना विचारले" तुमचा ऍक्सीडेन्ट झाला होता का कधी?" त्यावर त्या गृहस्थाने दिलेले उत्तर आणि त्याने त्याची सांगितलेली ओळख दोन्ही गोष्टीने मी एका बाजूला खूप रोमांचित झालो होतो.

माझ्या मागे बसलेला तो गृहस्थ जो मला वेग कमी करण्यास सांगत होता तो दुसरा तिसरा कोणी नसून २५ वर्षां पेक्षा जास्त वेगाशी मैत्री आणि स्पर्धा करणारा मोटोक्रॉस चॅम्पिअन  होता. ४८० 'मोटोक्रॉस' स्पर्धा गाजविणारा आणि सात वेळा राष्ट्रीय मोटोक्रॉस चॅम्पिअन झालेला श्याम कोठारी होता. माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्या गाडीवर खुद्द वेगाचा राजा बसला होता. माझे कुतूहल अजून वाढले आणि मी त्यांना म्हणालो, "मी तुमचा चाहता आहे आणि मला हि वेगाशी स्पर्धा करायला आवडते". हे ऐकून श्यामजी म्हणाले "मित्रा ह्याच वेगामुळे मी मरणाच्या दारातून परत आलो आहे. हिमालयातल्या पर्वत रांगांमध्ये खडतर स्पर्धेत एका वळणावर माझी गाडी दगडावर आदळली आणि मी फेकला गेलो आणि जागेवर बेशुद्ध पडलो आणि शुद्धीवर आलो त्यावेळी अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. मी खूप गंभीररित्या जखमी झालो होतो. त्या दिवसापासून मी परत कधी बाईकला हाथ लावला नाही." मी सुन्न झालो. माझा वेग नकळतच कमी झाला होता. मी त्यांना भांडारकर रोडला सोडून त्यांचा निरोप घेतला.

त्या दिवशी माझ्या आयुष्यात दोन चांगल्या गोष्टी घडल्या होत्या, एक म्हणजे मला वेगाच्या बादशाहला भेटायला मिळाले होते. त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या होत्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेगा पक्षा आयुष्य किती अनमोल आहे हा धडा मिळाला होता. वेगाच्या राजाचे ते बोलणे माझ्या मनाला इतके भिडले होते कि त्या
दिवसापासून मी पुन्हा कधी बाईक वेगात चालवली नाही आणि कधी स्टंटही केला नाही. वेगाने गाडी चालवली कि आपण काहीतरी वेगळे करतोय आणि लोक आपल्याला चांगले म्हणून आपल्याकडे पाहत नाहीत तर आपल्याला मूर्खच म्हणतात ह्याची जाणीव झाली. त्या १०-१५ मिनिटाच्या गप्पांमधून श्याम कोठारींच्या अनुभवाचे बोल मला खूप काही शिकवून गेले. गाडी कोणती हि असो शेवटी ते एक मशीनच आहे आणि ते कधीही घात करू शकते.  मनाच्या कोपऱ्यात आजही हे कोरलेले आहे आणि ते तसेच राहील ह्यात शंका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com