तिळासारखं.....गुळासारखं!

aruna-nagarkar
aruna-nagarkar

घटना तशी छोटीशीच. शाळेच्या दिवसातील. आमचा चार जणींचा ग्रुप होता. मी, सुनीता, अनिता आणि वर्षा. शाळेत डबा खायची सुटी झाली की पटापट डबे खाऊन लंगडी, पकडापकडी खेळायचो. असंच एक दिवस खेळताना काहीतरी बिनसलं. आम्हा चौघींचे दोन तट पडले. मी आणि सुनीता. अनिता आणि वर्षा. एकमेकींशी अबोला. एकदम कट्टीच. चार-पाच दिवस गेले. आम्ही शाळेत जायचो. पण काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं. खरं तर आम्हाला हा अबोला असह्य व्हायला लागला होता. भांडणाची खुमखुमी केव्हाच जिरली होती. एकमेकींशी बोलावं असं खूप वाटत होतं. पण आम्ही आपणहून त्यांच्याकडे कशा जाणार? ‘इगो’ आड येत होता. नमतं घेणं म्हणजे कमीपणा वाटत होता. दुसऱ्याला समजून घेऊन क्षमा करणं, ही फारच लांबची गोष्ट. मन फार बेचैन झालं होतं, काय करावं कळत नव्हतं. 

आणि अशावेळी जानेवारीत सरत्या थंडीत, उन्हाळ्याच्या आगमनाची सूचना देणारी संक्रांत आली. त्या वेळी आईनं आम्हाला समजावून सांगितलं, मग आम्ही दोघींनीही ठरवलं, की आता फार झालं. आपलं भांडण विसरायचं. परत मैत्रीचा हात पुढे करायचा, त्यांच्या हातात तिळगुळाची वडी द्यायची. आपण त्यांच्याशी गोड बोलायचं आणि त्यांना ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ अशी विनंती करायची. मागची भांडणं, वेडवाकडं वागणं, गैरसमज, सगळं सगळं विसरून जायचं. तुटलेली मैत्री पुन्हा नव्यानं सांधायची. तिळगुळापासून मिळणारा गोडवा, स्निग्धपणा जसा शरीराला उपयोगी असतो, तसा गोडवा चांगली नाती टिकवायला, नव्यानं निर्माण करायला उपयोगात आणायचा. 

मग संक्रातीला शाळेत जाताना इतर मैत्रिणींना, शिक्षकांना आणि खास करून त्या दोघींना देण्यासाठी आम्ही तिळगूळ बरोबर नेला. त्या दोघींकडे बघून नेहमीसारखी मान न फिरवता, प्रसन्न चेहऱ्याने त्या दोघींना आम्ही दोघींनी तिळगूळ दिला आणि ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असं म्हटलं आणि काय आश्‍चर्य! त्या दोघींनाही इतका आनंद झाला की बास. आता आश्‍चर्यचकित व्हायची पाळी आमची होती. कारण त्या दोघींनीही आम्हाला द्यायला तिळगूळ आणला होता आणि आम्हा दोघींची नावं लिहिलेलं शुभेच्छापत्रही आणलं होतं. मग काय, चौघीजणी गळ्यात गळे घालून खूप हसलो, अगदी आनंदाश्रूंचे मोती सांडेपर्यंत!

‘संक्रांत’ म्हटलं की खूप काही नजरेसमोर येतं. आकर्षक, पारदर्शक अशा कापडाच्या हलवा भरलेल्या छोट्या-छोट्या थैल्या, छोट्या मुलांनी कातरकाम करून बनवलेले घोटीव कागदाचे रंगीबेरंगी हलव्याचे डबे, वाण म्हणून लुटण्याच्या वस्तूंनी भरलेली दुकानं, खापराची सुगडं, शुभेच्छापत्र वगैरे - वगैरे बरंच काही. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत सर्व जण आवर्जून गुळाच्या पोळ्यांवर ताव मारतात. नवविवाहित जोडप्यासाठी संक्रांत सण खास असतो. सासर, माहेर दोन्ही घरची मंडळी नव्या नवरीला आणि नवऱ्याला हलव्याचे दागिने घालून सालंकृत करतात. लाडक्‍या जावयाला चांदीच्या वाटीतून हलवा, तिळगूळ मिळतो, तर लाडक्‍या सुनेला मोत्याचा दागिना आणि काळी चंद्रकळा मिळते. जसे खऱ्या दागिन्यांचे प्रकार असतात, तसे प्रकार हलव्याच्या दागिन्यांचेही बनवतात. त्यातून दागिने बनविणाऱ्या व्यक्तीची कल्पकता दिसते, कला दिसते.

तान्ह्या बाळांनाही हलव्याचे सुंदर - सुंदर दागिने घालतात, हलव्याने मढवलेला मुकुट घालतात. काळ्या रंगाचं झबलं आणि असे दागिने परिधान केलेलं गोंडस बाळ काय गोड दिसतं! बाळाचे आई-बाबा, घरातले सगळे जण, शेजार-पाजारचे बाळाकडे अगदी हरखून पाहतात, कौतुक करतात. बाळाच्या छोट्या - छोट्या मित्रमंडळीच्या घोळक्‍यात बोरन्हाण झोकात पार पडतं. चुरमुरे, बोरं, उसाचे करवे गोळा करण्यात चिल्लीपिल्ली रंगून जातात. हलवा, तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, भोगीची भाजी-भाकरी खाण्यामागं शास्त्रीय कारण आहे. थंडीच्या मोसमात शरीराला जास्त उष्णता मिळण्याची गरज असते, ती या सगळ्यामुळे मिळते.

संक्रांतीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. उन्हाळ्याची चाहूल लागते. अशा बदलत्या ऋतुमानाशी आरोग्याची सांगड घालायला लागते आणि हेच काम तिळगूळ करतो. तिळाची वडी जशी खोबरं, वेलदोडा यासह इतर गोष्टी सामावून घेते आणि अधिक रुचकर होते, तसं आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना सामावून घेतलं तर आपलं आयुष्यही अधिक गोड होईल. आजच्या व्हॉट्‌स ॲपच्या जमान्यात शक्‍यतो ‘ई-तिळगूळ’ न पाठवता, जर प्रत्यक्ष गाठभेट घेऊन खराखुरा तिळगूळ देता आला तर एकमेकांच्या मनात निर्माण झालेला आनंद समक्ष अनुभवता येईल, नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com