ते यांत्रिक दिवस

अरविंद बोंद्रे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

एखादा अभ्यासक्रम सुरू केला जातो, अचानक काही शैक्षणिक निर्णय घेतले जातात; पण त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या कारकिर्दीवर काय परिणाम होईल, याचा मात्र विचार केला जात नाही.

एखादा अभ्यासक्रम सुरू केला जातो, अचानक काही शैक्षणिक निर्णय घेतले जातात; पण त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या कारकिर्दीवर काय परिणाम होईल, याचा मात्र विचार केला जात नाही.

प्रत्येक विद्यालयाचे एक वैशिष्ट्यपूर्ण असे व्यक्तिमत्त्व असते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत शिक्षणाइतकेच योगदान विद्यालयातील वातावरणाचे असते. आज चाळीस-पन्नास वर्षांनंतरही माझ्या माध्यमिक शाळेतील ते सुसंस्कृत वातावरण मनाला मोहित करते. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या स्वातंत्र्यप्रेमी आणि द्रष्ट्या विचारवंतांनी सुरू केलेल्या त्या शाळेच्या वातावरणात स्वदेशाविषयीचा जाज्वल्य अभिमान तर ओसंडून वाहत असेच; पण उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच कलाविकासाला, देशी-विदेशी खेळांना आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही तिथे भरपूर वाव होता. त्याचे मोल मला आठव्या इयतेत गेल्यानंतर समजले.

माझ्या इयत्ता सातवीच्या शेवटी शेवटी महाराष्ट्रातील काही मोजक्‍या शहरांतून समांतर प्रौद्योगिक शिक्षणाचा अभ्यासकर्म सुरू करण्यात आला. त्याला पात्र ठरण्यासाठी एक प्रवेश परीक्षा घेण्यात येऊन नंतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. मला त्या अभ्यासक्रमासाठी निवडले होते. इयत्ता आठवी ते अकरावी असा एकूण चार वर्षांचा तो समांतर अभ्यासक्रम होता. आठवड्यातील पाच दिवस आमचे शिक्षण आमच्या माध्यमिक शाळेत, तर बाकीचे दोन दिवस प्रौद्योगिक विद्यालयात होणार होते. प्रौद्योगिक अभ्यासक्रमात यंत्रशास्त्र, यंत्र आरेखन आणि कार्यशाळा तंत्रज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आला होता. त्यासाठी नेहमीच्या अभ्यासक्रमातील इतिहास, भूगोल व संस्कृत हे विषय आम्ही सोडायचे होते.

या समांतर अभ्यासक्रमाला सुरवात तर धुमधडाक्‍यात झाली. पण हळूहळू त्या दोन विद्यालयातील वातावरणातला फरक प्रकर्षाने जाणवू लागला. विद्यार्थ्यांचा "सर्वांगीण विकास' हा आमच्या शाळेतील शिक्षणाचा मूलमंत्र होता. तर प्रौद्योगिक विद्यालयातील संपूर्ण वातावरणाचा केंद्रबिंदू "यंत्र' होता. अनेकदा त्या वातावरणातील यांत्रिकपणाचा मला अनुभव आला आणि कळत-नकळत मी त्याची तुलना आमच्या माध्यमिक शाळेशी करू लागलो. याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे सातव्या इयत्तेत, कर्नाटक राज्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांची माहिती शिकल्यानंतर शाळेतर्फे आम्ही त्या राज्यातील गोकाक येथे सहलीला गेलो होतो. तिथल्या घटप्रभा नदीवरचा भव्यदिव्य धबधबा डोळे भरून पाहिला होता आणि तेवढ्या पुरता का होईना, तिथला भूगोल प्रत्यक्ष अनुभवला होता. याउलट जेम्स वॉटच्या वाफेच्या इंजिनाची माहिती प्रौद्योगिक विद्यालयात आम्हाला केवळ पुस्तकाच्या छापील पानांतून वाचून दाखवण्यात आली होती. खरे, तर जगाचा इतिहास बदलणारे हे इंजिन आम्हाला प्रत्यक्ष दाखवायला हवे होते, किमान प्रतिकृतीच्या साह्याने तरी त्याचे कार्य स्पष्ट करायला हवे होते. नाही म्हणायला, खास प्रौद्योगिक विनोदबुद्धीचा अनुभव मात्र आम्हाला एकदा अनपेक्षितपणे घेता आला.

विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्याची कल्पना जाहीर करण्यात आली. झाडे शिक्षकांच्या नावांनी लावली जाणार होती आणि त्यासाठी खड्डे अर्थातच विद्यार्थ्यांनी खणायचे होते. आम्हीही हातात कुदळी-फावडी घेऊन, "साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना' हे त्या वेळचे गाजलेले चित्रपटगीत म्हणत, उत्साहाने खड्डे खणायला सुरवात केली. पण आमच्या यंत्रशाळा अधीक्षकांनी आम्हाला दरडावून सांगितले, ""विद्यालयाच्या आवारात गाणे म्हणायला बंदी आहे. इतकीच खुमखुमी असेल तर मनातल्या मनात म्हणा.'' "समूहगीत' आणि तेही मनातल्या मनात गाण्याची ती अभिजात विनोदी कल्पना ऐकून आम्हाला खूप हसू आले; पण तेही मनातल्या मनातच! अहो, जिथे समूहगानही मनातल्या मनात म्हणायचा अलिखित वटहुकूम जारी करण्यात येत होता, तिथे मोकळ्या वेळात स्वयंसेवी श्रमदान करतानासुद्धा मोठ्याने हसणे हा तर दखलपात्र गुन्हाच समजला गेला असता!

पुढे पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालो. आज पुण्यात उद्योजक-अभियंता म्हणून स्वतःचा व्यवसाय करत आहे. मला प्रामाणिकपणे वाटते, की शाळेच्या वयातील विद्यार्थ्यांना प्रौद्योगिक शिक्षण देण्याची कल्पना योग्य असेलही; पण ती चांगल्या प्रकारे कार्यान्वित करणे निश्‍चितच शक्‍य होते. कोणत्याही शिक्षणाचा मुख्य उद्देश कार्यक्षम; पण आज्ञाधारक "यंत्र' किंवा "यंत्रमानव' तयार करणे हा नसून सुशिक्षित, सुसंस्कृत, स्वावलंबी, आणि संवेदनशील "माणूस' घडवणे हाच असायला हवा. प्रौद्योगिक अभ्यासक्रम घेऊन एसएससी झाल्यामुळे आमच्या प्री-प्रोफेशनल, म्हणजे हल्लीच्या बारावीच्या गुणसंख्येत मोजून साडेचार टक्‍क्‍यांची भर पडली. पण संस्कारक्षम वयातल्या विद्यार्थ्यांच्या काही पिढ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेत नक्की किती तरी टक्‍क्‍यांनी घट झाली होती. यंत्रांबरोबर काम करायचे म्हणून माणसांची यंत्रे होऊ देता कामा नये. यंत्रांच्या खडखडाटाला तबल्याचा ताल द्यायला शिकवायला हवे. कच्च्या लोखंडाच्या खणखणाटाला घुंगराची साथ द्यायला शिकवायला हवे. झांजांचा आवाज घुमला पाहिजे. कारखान्याच्या लयीत समूहगीतांची लय भिनली पाहिजे. श्रमसंस्कृतीचा तो महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक जण स्वतंत्ररीत्या विकसित झाला, तरच त्या घामाला सुगंध प्राप्त होतो.

Web Title: arvind bondre write article in muktapeeth