गुपिताचा उत्सव

गुपिताचा उत्सव

अमेरिकेतील वास्तव्यात एक अनोखा समारंभ अनुभवता आला. ‘जेंडर रिव्हिलिंग सेलेमनी’ म्हणजेच गर्भलिंग गौप्यस्फोट. म्हणजे मित्रमंडळीना, आप्तांना बाळाच्या आगमनाआधीच त्याच्याविषयीचा गौप्यस्फोट करायचा. तिकडे गर्भलिंग निदान करण्यास परवानगी आहे.  मुलगा होणार की मुलगी याचे उत्तर आई-वडिलांना आधीच माहिती होते. समारंभपूर्वक हे गुपित मित्रमंडळींना उघड करण्याची मजा काही औरच. 

संध्याकाळी सगळी मित्रमंडळी, सोबत आमच्यासारखी काही पालकमंडळी, या समारंभाकरिता अमरच्या घरी जमली होती. हॉल अगदी छान सजविला होता, फुगे, झिरमिळ्या डोलत होत्या. अमर, अनिताला बाळ होणार होते. त्यांचा उत्साह दांगडा होता. अतिशय आपलेपणाने, हसतमुखाने त्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. हलके खाद्यपदार्थ आणि सरबताने कार्यक्रमाची सुरवात झाली.

हळूहळू माझ्या असे लक्षात आले, की जमलेल्या मंडळींमध्ये काही जणांचे कपडे निळे होते, तर काहींचे गुलाबी होते. मला आश्‍चर्यच वाटले, तर खरी मजा अशी होती, की अमर-अनिताने आधीच सर्व मित्रमंडळींना सांगितले होते, की ज्यांना मुलगा होईल असे वाटत असेल त्यांनी निळे कपडे घालायचे आणि मुलगी होईल असे वाटत असेल त्यांनी गुलाबी कपडे घालायचे. थोडक्‍यात, आपापला अंदाज अशा तऱ्हेने व्यक्त करायचा. अमरने निळा शर्ट घातला होता, तर अनिताने गुलाबी पेहराव केला होता. त्या दोघांना तर माहीत असूनही त्यांनी सगळ्यांची उत्सुकता वाढविण्याकरिता निळा, गुलाबी दोन्ही रंगांचे कपडे निवडले होते.

मग हसतखेळत ग्रुप फोटो काढले. म्हणजे निळे कपडे घातलेल्यांचा एकत्र फोटो, नंतर गुलाबी कपडे घातलेल्यांचा फोटो. तेव्हाच मोजणी झाली. निळे कपडे, गुलाबी कपडे किती जणांनी घातले, मग बहुमत काय सांगते? टाळ्या, हसणे, खिदळणे, निकोप वातावरणात खूप मजा चालली होती. सगळेच खूप आनंदात होते. मध्येच अनिताने आम्हा पालकमंडळींना आमचा पण अंदाज विचारला. आमच्याबरोबर पण फोटो काढले.

नंतर गाण्यांच्या भेंड्या, डम्प शेडर्स आणखी काही नावीन्यपूर्ण खेळ खेळले गेले आणि मग समारंभातील महत्त्वाचा भाग सुरू झाला. एक मोठा पॅकबंद बॉक्‍स मध्यभागी ठेवण्यात आला. सगळे बाजूला गोल करून बसले होते. मग अमर - अनिताने तो बॉक्‍स उघडायला सुरवात केली. सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर उत्सुकता शिगेला पोचली होती. आणि तेवढ्यात अमरने बॉक्‍स उघडला. एकदम चार-पाच निळ्या फुग्यांचा गुच्छ फटकन बाहेर आला. गॅस भरलेले फुगे असल्यामुळे ते ताठ उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात एकच आवाज घुमला - ‘बेबी बॉय’. अमर - अनितावर सगळ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. 

या समारंभाची उत्सुकता होतीच. साहजिकच बसल्या बसल्या चौकशी सुरू झाली. त्या वेळी समजले, की गर्भलिंगनिदानाचा अहवाल मिळाला, की तिकडे अशी काही दुकाने आहेत, की त्यात तुमचा अहवाल त्यांना दिला, की तो व्यवस्थित ‘गिफ्ट पॅक’ करून देतात. निळे फुगे किंवा गुलाबी फुगे म्हणजे मुलगा किंवा मुलगी ह्यांचे प्रतीक. मुलगा किंवा मुलगी दोघांचेही स्वागत तेवढ्यात आनंदात केले जाते. अमर म्हणालासुद्धा, की मला गुलाबी फुगे पण आवडले असते.

आपल्याकडे डोहाळेजेवणाच्या वेळी पेढ्याची वाटी किंवा बर्फीची वाटी उघडली, की मुलगा, की मुलगी याचा अंदाज व्यक्त करतात. अर्थात, तो अंदाज असतो. एक गंमत असते. आणखी एक गोष्ट म्हणजे बाळाच्या जन्मापर्यंत एक उत्सुकता ताणून राहते, ती एक वेगळीच मजा असते. तरीही या कार्यक्रमात खरेखुरे निदान समारंभपूर्वक सगळ्यांना कसे उघड केले गेले हे अनुभवले. मुलगी, की मुलगी हे आधी समजल्यामुळे बाळासाठीचे कपडे, खेळणी त्यानुसार आणणे, बाळाचे नाव ठरविणे या गोष्टी सोप्या होतात. समाज बदलतो, त्याची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे जन्माच्या गुपिताचे सोहळेही वेगळे असतात. 

समारंभाची सांगता सगळ्यांच्या जेवणाने झाली. मनात आले, कोणत्याही समाजात मुलगा किंवा मुलगी असा भेद करूच नये. मुलीही तेवढ्याच कर्तबगार असतात. पण हे संवेदनशीलतेने जाणून घेणारा समाज हवा. परंतु जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्याकडे गर्भलिंगनिदानावर असलेली बंदी उठणार नाही. अर्थातच अमेरिकेतील गर्भलिंग गौप्यस्फोटासारखा असा समारंभ आपल्याकडे होणे नाही. 

हलक्‍या-फुलक्‍या वातावरणात बाळाच्या होऊ घातलेल्या आगमनाचे इतके अनोखे स्वागत सर्वांनाच खूप आनंद देऊन गेले. मला तर वाटते, की अनिताच्या पोटातील बाळ पण या समारंभातील आनंदमयी वातावरणाने नक्कीच खूप सुखावले असेल! त्या बाळाचा सोहळा आतापासूनच सुरू झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com