आनंदाचे झरे

अश्विनी कवळे
बुधवार, 8 मार्च 2017

 

त्या पाच जणी. हाताच्या पाच बोटांनी एकत्र येऊन काही काम करावं, तशा एकत्र आलेल्या. साहित्यनिर्मिती व चर्चा यात रंगून गेलेल्या. त्यातील चौघींची पुस्तके एकाच दिवशी प्रसिद्ध होत आहेत. या सहप्रवासाविषयी...

 

समानशीले व्यसनेषु सख्यं ... असं कुणा जाणत्या व्यक्तीने म्हणून ठेवलंय. याच वचनाला अनुसरून लिहिण्यावाचण्याचं व्यसन लागलेल्या आम्ही काहीजणी एका साहित्यिक अड्ड्यावर भेटलो आणि आमचं नुसतं सख्यच नाही, तर गाढ मैत्र जुळून गेलं.

 

त्या पाच जणी. हाताच्या पाच बोटांनी एकत्र येऊन काही काम करावं, तशा एकत्र आलेल्या. साहित्यनिर्मिती व चर्चा यात रंगून गेलेल्या. त्यातील चौघींची पुस्तके एकाच दिवशी प्रसिद्ध होत आहेत. या सहप्रवासाविषयी...

 

समानशीले व्यसनेषु सख्यं ... असं कुणा जाणत्या व्यक्तीने म्हणून ठेवलंय. याच वचनाला अनुसरून लिहिण्यावाचण्याचं व्यसन लागलेल्या आम्ही काहीजणी एका साहित्यिक अड्ड्यावर भेटलो आणि आमचं नुसतं सख्यच नाही, तर गाढ मैत्र जुळून गेलं.

"अंतर्नाद' या मासिकानं काही वर्षांपूर्वी एक कथाशिबिर घेतलं, त्या वेळी आमची भेट झाली. सगळ्यांचं मराठी वाङ्‌मयावर प्रेम आणि त्यात आपापल्या परीनं भर घालण्याची दांडगी हौसही. ही केवळ भाबडी हौस नव्हती. उलट आपण जे लिहितोय ते जास्तीत जास्त निर्दोष, परिपूर्णतेच्या जवळ जाणारं असावं अशी एक शहाणी जाणीवही मनात होती. म्हणूनच आम्ही एक उपक्रम सुरू केला.. महिन्यातून एकदा आपापल्या कथेसहित भेटायचं! कथा वाचून झाल्यावर प्रत्येकानं त्या कथेचं विश्‍लेषण करायचं. अगदी कथेच्या शीर्षकापासून ते कथेच्या शेवटच्या शब्दापर्यंत त्या कथेवर चर्चा केली जायची. म्हणजे कथेचं शीर्षक समर्पक आहे का, की त्यातून कथेचा सगळाच आशय व्यक्त होतोय? कथेतील पात्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांनुसार बोलतायत की ते लेखकाचीच भाषा बोलतायत? कथानकामध्ये सुसंगतता आहे का? की उगीच आपले लेखकाला वाटतेय म्हणून काहीही घडताना दाखवलेय? कथेत सुसूत्रता आहे की विस्कळितपणा वाटतोय? लेखकाला वाचकापर्यंत जे नेमकेपणाने पोचवायचेय ते खरेच पोचतेय का? एकूण काय ... कथेमधील साहित्यगुणांची बेरीजवजाबाकी मांडली जायची. त्यातून काय हवं असेल ते त्या मूळ लेखकानं घ्यावं, स्वीकारावं आणि नव्यानं आपल्या कथेचा विचार करावा अशी यामागे कल्पना असायची. आमची "साहित्यिक ओढ' इतकी निकोप होती की दर महिन्याचा हा कार्यक्रम नेमाने पार पडायला लागला. कधी कुणाच्या घरी तर कधी एखाद्या बागेतसुद्धा. दर वेळी ताज्या लिखाणावर तावातावानं चर्चा व्हायची. उलटसुलट मतं पुढे यायची. कुणी नवीन काही वाचलं असेल तर त्याचे दाखलेही दिले जायचे. आपल्या कथेची इतकी चिरफाड केली म्हणून आम्हाला कधीही राग यायचा नाही. उलट आपल्या कथेवर जास्तीत जास्त बारकाईनं चर्चा व्हावी अशीच आमची इच्छा असायची.

या आमच्या ग्रुपमध्ये आम्ही वेगवेगळे प्रयोग करून बघितले. एखादा विषय ठरवून घेत असू. आणि मग त्यावर प्रत्येकानं स्वतंत्रपणे कथा लिहिल्या. एखाद्या घटनेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात स्त्री आणि पुरुषांमध्ये फरक असतोच म्हणून मग आमच्या या ग्रुपमध्ये आम्ही काही लेखक मित्रांनाही आमंत्रण दिलं. त्यांची मतं, विचार, व्यक्त होण्याची शैली आमच्या अनुभवांना एक वेगळा आयाम देऊन गेल्या. एक विषय ठरवून घ्यायचा आणि एकच कथा एकेकानं पुरी करीत न्यायची असाही प्रयोग आम्ही केला. पुढे काही ना काही कारणानं या ग्रुपमधल्या साहित्यिक सदस्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. मात्र अनघा केसकर, योगिनी वेंगुर्लेकर, ज्योती कानेटकर, माधुरी तळवलकर आणि मी स्वतः असा आमचा पाचजणींचा ग्रुप मात्र अधिक जवळ आला. घट्ट होत गेला. ठरवून अगदी दर महिन्याला अमुक तारखेला भेटायचंच असं व्हायचं नाही. पण जेव्हा भेटायचो तेव्हा चांगले तीन-चार तास वेळ काढून आम्ही अशा काही जोरकस गप्पा मारायचो, की अगदी एखाद्या साहित्यसंमेलनाला जाऊन आल्यासारखं समाधान मिळायचं.

कुणी जुनेजाणते साहित्यिक आमच्या ग्रुपमधे नसले तरी आमचे प्रयोग आणि साहित्यप्रवास योग्य दिशेनं चाललाय याची पावती मधूनमधून मिळायची आणि आमचा हुरूप वाढायचा. आमच्यातल्या अनघाच्या वेगळ्या विषयावरच्या कादंबरीची दखल ना. सी. फडके प्रतिष्ठानने घेतली, तर माधुरीच्या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळाला. जन्मानं तमीळ, पण पालनपोषण अस्सल मराठी कुटुंबात आणि शिक्षणाची भाषा इंग्रजी अशा भाषाश्रीमंत ज्योतीच्या कथा आणि कविता देश ओलांडून पल्याड पोचल्या. पुणे म.सा.प.ने योगिनीच्या वेगळ्या विषयावरच्या कथांचा शंकर पाटील पुरस्कार देऊन गौरव केला. एकाच विषयाच्या दोन बाजू मांडणारी आमची जोडकथा औरंगाबादच्या कुसुमांजली संमेलनात भाव खाऊन गेली.

एवढ्या वर्षांच्या काळात, लेखनाची आवड जपताना नकळतपणे आम्ही एक स्वप्न पाहिलं आणि आता ते पुढच्याच आठवड्यात पुरं होतं आहे. चार मैत्रिणींचे कथासंग्रह एकाच दिवशी एकाच प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित होत आहेत. चार मैत्रिणींचे कथासंग्रह एकदम प्रसिद्ध होण्याच्या घटना मराठी वाङ्‌मयेतिहासात क्वचितच घडल्या असतील. हा भाग्ययोग आम्हाला आमच्या मैत्रीने दिला. आमच्या लेखनामुळे मराठी वाङ्‌मयामध्ये किती मोलाची भर पडणार आहे कोण जाणे, पण आमच्या आयुष्यात मात्र आनंदाची आणि समाधानाची भर नक्कीच पडली. सर्वसामान्यांच्या आयुष्यात असतात तसे अडथळे, ताणतणाव, समस्या आमच्याही आयुष्यात आहेतच. पण त्या अडथळ्यांखाली लपलेले आनंदाचे झरे आम्ही लेखनाच्या रूपानं शोधून काढलेत आणि त्या झऱ्यांचा प्रवाह आम्हाला सतत वाहता ठेवायचाय.. आमच्या मैत्रीसारखाच.