श्रमदानातून श्रमसंस्कार

श्रमदानातून श्रमसंस्कार

श्रमसंस्कारांची ताकद मोठी आहे. आर्थिकदृष्ट्या न परवडणारी कामेही श्रमदानातून सहज पार पडतात. डोंगर वाकवण्याची शक्ती या श्रमसंस्कारात आहे. ती ओळखायला हवी.

नुकतीच पदवी परीक्षा देऊन अभ्यासातून मोकळा झालो होतो. माझे परममित्र द्वारकानाथ लेले म्हणाले, ""अरे, राष्ट्र सेवा दलाने आयोजित केलेल्या शिबिरात दाखल होऊया का?'' मला ही चांगली संधी चालून आल्यासारखे वाटले. ते शिबिर सुरू होऊन बरेच दिवस लोटले होते. आम्ही दोघे जण प्रा. ग. प्र. प्रधान सर यांना भेटून आमची शिबिरात सामील होण्याची इच्छा सांगितली. त्यांनीही शिबिराचे संचालक लालजी कुलकर्णी यांना चिठ्ठी लिहून दिली.

धोंडज येथील झिरप तलाव श्रमदानातून बांधून दिला जात होता. आम्ही पोचलो तेव्हा बांध घालण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले होते. फक्त काही माती, मुरमाची भर टाकण्याचे काम तेवढे बाकी होते. लालजींनी कामाची कल्पना दिली. टिकावाने माती खणायची, ती घमेल्यात भरावयाची व डोक्‍यावर घमेले घेऊन नियोजित ठिकाणी रिकामी करायची, असे अंगमेहनतीचे काम रोज तीन-चार तास करायचे. कामाची सक्ती नव्हती, तर अंतःकरणापासूनची भावना. त्यानंतर त्या झिरप तलावास कधीच भेट देण्याचा योग आला नाही; परंतु शिबिराला जमलेले आमच्यासारखे वीस-बावीस वर्षांचे युवक अत्यंत खेळीमेळीने राहिले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून आलेले तीस-पस्तीस जण एकमेकांशी आपल्याला आलेले अनुभव मोकळेपणाने सांगत. आता ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. राम ताकवले या शिबिरात होते. त्यांनी आपले आडनाव "ताकवले' कसे पडले, याची हकीकत मोठ्या मनोरंजकपणे सांगितलेली आठवते. पूर्वी त्यांच्याकडे खूप दुभती जनावरे (गाई, म्हशी) असत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधापासून मिळणारे ताक इतके मुबलक मिळे की ते रोज सर्व गावास वाटले जाई. त्यावरून त्यांच्या पूर्वजास "ताकवाले' संबोधले जाई व पुढे पुढे त्याचा अपभ्रंश होऊन "ताकवले' असे कायमचे आडनाव बनले.

या श्रमदान शिबिराची समाप्ती झाली. त्या दिवशीच ग्रामस्थापैकीच कुणाच्या घरी लग्न होते. शिबिरातील आम्हा सर्वांना त्या ग्रामस्थांनी आग्रहपूर्वक जेवावयास बोलाविले होते. तेलच्या आणि गुळवणी हा खास बेत होता. तेलच्या म्हणजे तेलात तळलेल्या जाड व मोठ्या आकाराच्या पुऱ्या. सर्व जण मनसोक्त जेवले. त्याच दिवशी समारोपाची सभा झाली. बरीच मुले बोलली. लालजींनी चार शब्द सांगितल्यानंतर प्रधान सरांचे अत्यंत सुंदर भाषण ऐकावयास मिळाले. त्या पैकी एक वाक्‍य कायमचे आठवणीत राहिले व प्रेरणा देत राहिले. ते म्हणाले होते, "या शिबिरास श्रमदान शिबिर न म्हणता श्रम संस्कार शिबिरच म्हणणे सयुक्तिक होईल.'

प्रधान सरांनी केलेले संस्कार जन्मभर मार्गदर्शक तर झालेच, परंतु ते प्रत्यक्षात उतरविण्याचा योग पुढे चालून आला.

मी पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असताना माझी नियुक्ती विद्यामंदिर, पोलादपूर (जिल्हा रायगड) येथे शाळा प्रमुख म्हणून झाली. आठवी ते अकरावीचे वर्ग ग्रामपंचायतीने बांधून दिलेल्या इमारतीत मोठ्या अडचणीत भरत. इमारतीला लागूनच दोन-तीन खोल्यांचे जोत्यापर्यंतचे अर्धवट काम तसेच पडून होते. माझ्या मनात विचार आला की, संस्थेला किंवा ग्रामपंचायतीला विनंती न करता विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून हे बांधकाम करून घ्यावे. त्या कामी स्थानिक गटविकास अधिकारी चव्हाणसाहेब, डॉ. करमरकर व अन्य काही जणांचे बहुमोल साहाय्य मिळाले. प्रथम इमारतीस लागणाऱ्या विटा तयार केल्या. श्रमदानातून अथपासून इथपर्यंत म्हणजे माती गोळा करणे, ती गाळणे, त्याचा चिखल करणे, त्यासाठी लागणारे पाणी लांबवर वाहणाऱ्या सरस्वती नदीतून आणणे, विटा पाडणे, त्या व्यवस्थित रांगेत वाळण्यासाठी मांडून ठेवणे व त्या सुकल्यानंतर त्या भाजण्यासाठी रचून ठेवणे, त्यासाठी भाताचा कोंडा गोळा करणे, विटा भाजून इमारतीस तयार करून ठेवणे इत्यादी कामे विद्यार्थ्यांकडून श्रमदानाने करून घेतली. अर्थात, सहकाऱ्यांचा त्याकामी वाटा मोठा होता. डॉ. करमरकर हे अत्यंत तडफदार, रोखठोक, अत्यंत निष्ठावान व त्यागी अशी आसामी. त्यांची तर आठवण कधीच विसरता येणार नाही. त्यांनी स्वतःच्या घरासाठी जमा केलेले लाकडी साहित्य मागेपुढे कसलाच विचार न करता सर्वच्या सर्व शाळेसाठी मोफत दिले. खोल्यांच्या बांधकामावर जातीने लक्ष दिले. येणाऱ्या अडचणींना सहजरीत्या पार करून एकदाच्या खोल्या, अगदी मंगलोरी कौलाच्या, देखण्या खोल्या उभ्या राहिल्या. हे सर्व कशामुळे घडले? मला वाटते श्रमदान शिबिरातील संस्कारामधूनच!

आज काल काही स्वयंसेवी संस्था महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अतोनात कष्ट घेताना दिसतात. त्यांना जनतेची तेवढीच प्रचंड साथ मिळताना दिसते. मनात विचार येतात, महाराष्ट्रालाच काय, अख्ख्या भारताला सुजलाम सुफलाम बनविण्याची शक्ती अशा श्रमदानात आहे. श्रमसंस्कार झालेल्या देशबांधवांची ही शक्ती आहे. फक्त सुरवात व्हायला हवी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com