कोंऽबडा कोनी मारियेला?

कोंऽबडा कोनी मारियेला?

लहानपणी व्यवहारी जग कळत नसते. आपल्याला कुणाचाही लळा लागतो. ते झाड असेल, तो पक्षी असेल किंवा एखादा प्राणी. त्याच्यावर आपला हक्क असतो. पण एका अनपेक्षित क्षणी त्या "आपल्या'वर व्यवहारी जगाची सुरी फिरते. त्या लालभडक क्षणाची पिसे आयुष्यभर आपल्याभोवती उडत राहतात.

आमचा मेहेंदुरी गाव अगदी लहान आणि दुर्गम होता. घराला लगटून घर. पावसावर अवलंबून असलेला खरीप हंगाम संपला, की शिवारात मरगळ. कालचक्राने खळदाढीत प्रवेश केला, की शेतात जागोजाग उभ्या केलेल्या बाजरीच्या आणि इरवडकाडीच्या कोचुळ्यांचे स्थलांतर खळ्यात होत असे. सवडीप्रमाणे कामे उरकण्याची सवलत मिळत असे. अशा वेळी गृहिणींचा आवडता आणि आर्थिक फायद्याचा उद्योग म्हणजे कोंबडी बसवणे. आमच्या आईने कोंबडीची चांगली निवडक टपोरी वीस एक अंडी जमवली. एका मोठ्या पाटीमध्ये जुन्या गोधडीचा मऊ मऊ तुकडा अंथरून त्यावर अंडी ठेवून त्यावर खुडूक कोंबडी बसविली. वर दुसरी पाटी झाकण टाकून चारा पाण्याची व्यवस्था केली. एकविसाव्या दिवशी जास्तच खुडबूड ऐकू आली. आईने पाटी उघडली. सुरवातीला कोंबडी पिलांना हात लावू देईना. आईने पिले मोजली. दहा की बारा भरली. बाकीची अंडी हळूच फोडून पाहिली ती नासून गेली होती. ते दहा बारा लुटुलुटु हलणारे जणू कापसाचे बोळे पाहून आम्हाला नवल वाटले. पण कोंबडी आम्हाला पिलांना हात लावू देईना. आईवर मात्र तिने विश्‍वास टाकला होता.
पिले मोठी होत गेली. त्यातील एक कोंबडा मोठा भक्कम दांडगट निघाला. दाणे टिपताना इतरांना हुसकावून स्वतः दाणे बळकावू लागला. त्याची दांडगाई मला खूपच आवडत असे. एक दिवस "हा माझा कोंबडा, याला कुणी हात लावायचा नाही' असे मी जाहीर केले. दिवसेंदिवस माझ्या कोंबड्याला रंग चढू लागले. तो मोठा ऐटबाज दिसू लागला. डौलदार मान, डोक्‍यावरचा तुरा, बाकदार चोच, हळदीसारखे पिवळे जर्द टणक पाय, तीक्ष्ण नख्या घेऊन तो सम्राटासारखा मोठ्या ऐटीने मिरवू लागला. एका मुहूर्तावर तो समोरच्या पडक्‍या भिंतीवर चढला आणि दमदारपणे बांग देऊन त्याने आपले पौरुषत्व जाहीर केले आणि कळपावर स्वामित्व प्रस्थापित केले. बांग देताना मान उंचावून जणू भुजंगासन करतो असे वाटे.

एक दिवस त्याला जवळ घेऊन दाणे चारीत असताना आई म्हणाली, ""चार, चार! त्याला दाणे चारून चांगला माजव. आपला गोपाळमामा आला म्हणजे याला कापायचाय. चांगला दोन शेर पडला पाहिजे.'' तो कोंबडा कापण्याच्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले.

घरातील सर्व मंडळी खळ्यावर गेली होती. घराला बाहेरून कडी लावून ओट्याच्या खाली मित्राबरोबर गोट्यांचा डाव मांडला. डाव रंगात आला. एकाएकी दुरून गोपाळमामा येताना दिसला. माझा गोटीवरचा नेम चुकला. दाराला कडी पाहून मामाने विचारले, "कुठे गेली रे माणसं?' मी म्हणालो, ""गेली असतील कुठे, मला नाही माहिती.'' माझा उर्मटपणा मामाने मनावर घेतला नाही. त्याने खांद्यावरच्या धोतराने ओटा झटकला आणि धोतर अंथरून भिंतीला टेकून आसन मांडले. बिडीची आणि खोकल्याची जुगलबंदी सुरू झाली. जरा वेळाने आई आली. भाऊ ओट्यावर वाट पाहत बसलेला पाहून आईने मला चांगलेच तासडले. मी ढिम्म राहिलो. आईने दाराची कडी काढली, मामाला पाणी दिले. हातपाय धुवायला पाणी ठेवले. चूल पेटवून साखरेचा चहा करून दिला. "दिसाड्या थंडीतापाची आज पाळी नव्हती. म्हणून गेले होते घडीभर खळ्यावर,' आई म्हणाली. मामाने खिशातून पुरचुंडी काढून आईजवळ दिली. "कटकीची चोळी!' म्हणाला. "कंपनीने उचल पाठवली. पण मुकादम बसलाय गुळणी धरून. आज काल लई तंगी.' त्याच्या चेहऱ्यावर दिलगिरी मावत नव्हती. आईने तिच्या पूर्वी माहेराहून आणलेल्या सध्या बिजागिऱ्या तुटलेल्या पत्र्याच्या प्रायव्हेट लिमिटेड ट्रंकमध्ये हळवार चोळी ठेवून दिली.

दिवस दोन कासरे राहिला होता. आई म्हणाली, "जा रे कोंबडा धरून आण.' मी जागचा हालेना. तिने शेजारच्या मुलांना सांगितले. मुले अतिशय उत्साहाने सरसावली. मी एक शिमटी घेतली आणि कोंबड्याला दूर दूर पिटाळू लागलो. बरीच पळापळ झाल्यावर तो गल्लीचा सम्राट थकला आणि धापा टाकीत एका दगडाच्या आडोशाला स्वस्थ बसला. मुलांनी त्याला पकडून आईजवळ दिले. आईने त्याला शेवटचे दाणापाणी दाखवले. पण त्याने घेतले नाही. आईने त्याला हारोट्याखाली डालले आणि माझ्याकडून दगाफटका होऊ नये म्हणून एक भक्कम जात्याची तळी वर ठेवली. थोड्याच वेळात बाबूमिया सुरी पिशवीत गुंडाळून हजर झाला. त्याने हारोट्यावरची तळी काढली. हारोटा थोडा वर उचलून आत हात घातला आणि कोंबडा निर्दयपणे उपसून बाहेर काढला. मला त्याच्या जिवाचा आकांत ऐकवेना. मला लाल ओघळ दिसला. जोराची फडफड ऐकू आली. मी दूर जाऊन एका दगडावर बसलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com