जगण्यातली समृद्धी

जगण्यातली समृद्धी

रुग्णांनी संशोधन क्षेत्रात समृद्ध केलं, तर सदाशिव पेठेतील पेंडसे चाळीतल्या लोकांनी मदतीचा हात देऊन जीवन सर्वार्थांनं समृद्ध केलं. वाटेत कितीतरी जणांनी सहकार्य केलं. म्हणूनच भारतीयांच्या मधुमेहासंबंधीचं संशोधन पूर्ण होत आलं.

"वर्ल्ड इंडिया डायबेटीस फाउंडेशन'ने मधुमेहाच्या संशोधनासाठी पुरस्कार दिला आणि अजूनही संशोधन करण्याचा उत्साह वाढला. माझं शिक्षण, जीवन, जगणं आणि संशोधन होत असताना वेगवेगळ्या स्तरावर निःस्पृहपणे कितीतरी जणांनी मला सहकार्य केलंय.

मी आई-बाबांचा एकुलता एक! वडील डॉक्‍टर! पण मी चौथीत असताना ते निवृत्त झालेले. थोडी फार प्रॅक्‍टिस करीत. आई संधिवाताने आजारी. मॉलिक्‍युलर बायॉलॉजीत संशोधन करायची इच्छा होती. पण त्या वेळेस ते फक्त अमेरिकेतच होत असे. नाइलाजाने पुण्यात बी. जे. मेडिकलला प्रवेश घेतला अन्‌ आईच्या आजाराने जोर धरला. बाबांना स्वयंपाकात मदत करून मगच कॉलेजला जावं लागायचं. पहिलं वर्ष कधी संपलं ते कळलंच नाही. दुसऱ्या वर्षाला असताना माझं ऍपेंडिक्‍सचं ऑपरेशन झालं. खूप अवघड होत, मी जगणार नाही, असंच सर्वांना वाटलं होतं. तेव्हा ससूनमधल्या सर्व शिक्षकांनी, डॉक्‍टर्सनी, डॉ. मंदा सवदी (पानसरे), सिस्टर्स यांनी अथक प्रयत्न केले. डॉ. मेहरू मेहतामॅडम तर माझ्यासाठी देवदूतच ठरल्या. मी वाचलो. सहा महिने कॉलेजात जाऊच शकलो नव्हतो. माझं वर्ष वाया जाऊ नये म्हणून सर्वांनीच खूप मदत केली; पण आई त्याच वर्षी सोडून गेली. पेंडसे चाळीतल्या (1511, सदाशिव पेठ) सगळ्यांनीच धीर दिला.

त्याच वेळेस "पुणे कॅन्सर रजिस्ट्री सेंटर'मध्ये अडीचशे रुपयांवर नोकरी मिळाली. तिथे डॉक्‍टरांच्या कामाची पद्धत, त्यांच्या बरोबरच्या चर्चा, रुग्णांचे अनुभव, त्यांची आजारपणं, त्यांच्या नातेवाइकांचे स्वभाव, बिलं भरताना होणारा त्रास या साऱ्यांच्या नोंदी ठेवत गेलो. तिसरं वर्ष सुरु झालं आणि बाबांच हर्नियाचं ऑपरेशन, ते मला परीक्षेपर्यंत पुरलं. एमबीबीएसला सगळ्या बॅचेसमध्ये पहिला आलो. इंटर्नशिप, पदव्युत्तर शिक्षण करताना संशोधन कसं व कोणतं करायचं, हे मनात पक्क होत गेलं.

भारतीय माणूस पाश्‍चात्त्यांच्या तुलनेत बारीक, फारशा स्थूल नसलेल्या व्यक्तींना व मुलांना मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षात आलं. असं का? यावर संशोधन करायचं, असं मनात रुजायला लागलं! भरपूर रुग्ण तपासायचे, निरीक्षणे नोंदवायची, हे मनोमन ठरवलं आणि पैशाचं पाठबळ नसताना संशोधनाला सुरवात केली. बिर्ला स्मारक कोशाची अभ्यासवृत्ती मिळाली आणि ऑक्‍सफर्डला संशोधन करायला लागलो. "काम करायची आंतरिक इच्छा असेल, तर जगातलं कोणीही येऊन मदत करतं' हे पावलो कोहेलोचं वाक्‍य मनात सतत घोळायचं. मी डॉ. डेरेक होकॅडो यांच्याकडे संशोधन करीत होतो. दुबईच्या शेख रशीद यांनी "डायबेटीस रिसर्च सेंटर' काढायला दहा लाख पौंड दिले. तिथे माझी "रिसर्च रजिस्टार' म्हणून नेमणूक झाली. संशोधन दुपटीनं सुरू झालं. एव्हाना माझं लग्न झालं होतं. मी आणि पल्लवी इंग्लडमध्ये होतो. त्याच वेळी बाबांना डिम्नेशिया झाला. संशोधन अर्धवट सोडून पुण्याला जावं लागणार होतं; पण चाळीतल्या दाते, सवदी, भट, पोखरणा कुटुंबीयांनी बाबांची काळजी घेण्याच ठरवलं. दाते कुटुंबीयांकडून रोज सकाळ-संध्याकाळ ताजं व गरम जेवण बाबांना मिळायचं. पल्लवीनं नोकरी केली. पैसे साठवले आणि बाबांना इंग्लडला घेऊन आलो. पेंडसे चाळीतल्या "माझ्या' लोकांनी मला आधार दिला नसता तर?

चार वर्षांनी इंग्लडहून परत आलो. भारतातच मधुमेही रुग्णांवर संशोधन करायचं होतं. माझ्या अभ्यासानुसार, निरीक्षणानुसार आणि रुग्णांच्या आजारांच्या नोंदीनुसार इंग्लड व भारतातल्या मधुमेही रुग्णांची लक्षणवैशिष्ट्ये वेगळी होती. जगप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. डेव्हिड बार्कर यांना संशोधनाची खात्री पटली. त्यांनी संशोधन पुढे चालू ठेवायला सांगितलं. "वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदे'ने संशोधन करण्यासाठी अनुदान दिलं. पण काही अडचणी आल्या. अनुदान न मिळताच सहा महिने संशोधन चालू होतं. पंतप्रधान राजीव गांधी यांनी डॉक्‍टर व संशोधकांना त्यांना पाहिजे त्या संस्थेत संशोधन कार्य करायला मिळेल, असे जाहीर केले आणि मी केईएममध्ये संशोधनाला सुरवात केली. त्याच वेळेस सुभाषनगरमधल्या डॉ. सुरेश गोखले यांच्या घरातल्या गॅरेजमध्ये क्‍लिनिक सुरू केलं.

मधुमेहाच्या संशोधनासाठी 1987 पासून इंग्लडच्या "वेलकम ट्रस्ट'ची अभ्यासवृत्ती आजतागायत चालू आहे. इतकी वर्षे सलग अभ्यासवृत्ती मिळणारा मी एकमेव भारतीय आहे. 1991 मध्ये पुन्हा मी मधुमेहावरचा सिद्धान्त मांडला. तो जगाने मान्य केला. माझ्या संशोधनाचं सार्थक झालं. त्या संशोधनात डॉ. किशोर शेळगीकर, डॉ. सदानंद नाईक व इतर कितीतरी जणांनी मदत केल्यामुळे संशोधनाला योग्य दिशा मिळाली. चांगले निष्कर्ष हाती येऊ लागले. पुण्यात केईएममध्ये आणि पुण्याजवळच्या वढू गावात चाललेलं हे संशोधन अंतिम टप्प्यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com