...असाही वाढदिवस

...असाही वाढदिवस

‘‘झिरपे सर...आज माझा वाढदिवस आहे!’’   ऋतिकाचे शब्द माझ्या कानावर आले आणि मी जरासा चमकलो. कारण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आम्हाला कायम विशिष्ट अलार्म, ठराविक आवाज आणि संवाद, हेच ऐकण्याची सवय जडलेली असते. सोळा वर्षांची  ऋतिका. आपल्या चेहऱ्यावरील परिचित असे स्मितहास्य कायम ठेवून माझ्याशी बोलत होती. माझ्याकडून तिला शुभेच्छा अपेक्षित होत्या, हे मला लक्षात आले. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिथून मनात विचारचक्र फिरले आणि एक छोटासा समारंभच आम्ही घडवून आणला. ही घटना म्हटली तर साधीच... म्हटली तर विलक्षण. पण, अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या आम्हा डॉक्‍टरांच्या, तेथे वावरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेणारी.

ऋतिका ही अवघ्या सोळा वर्षांची गोड मुलगी. ऋतिका आमच्या अतिदक्षता विभागात सुमारे पन्नास दिवसांपूर्वी दाखल झालेली. येथे आली तेव्हाच तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तीव्र जंतुसंसर्गामुळे तिच्या मूत्रपिंडाचे कार्य थांबलेले होते. सुरवातीचे चार-पाच दिवस तर आपण तिला वाचवू शकू का, याबाबत आम्ही साशंक होतो. मूत्रपिंडाने तर काम थांबविले होतेच. आता रक्तप्रवाह सुरळीत राखण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी तिला जीवरक्षक प्रणाली, अर्थात आर्टिफिशअल व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छ्वास) ठेवण्यात आले होते. त्याच वेळी तिला सातत्याने डायलिसिस करावे लागत होते. जवळपास ३९ दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. सदतीस वेळा डायलिसिस झाले. तिचे हृदय क्षमतेच्या केवळ तीस टक्केच काम करीत होते. तिचा मृत्यूशी जणू थेट संघर्ष सुरू होता. त्यास ती असामान्य धैर्याने तोंड देत गेली आणि हळूहळू आमच्या उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. आज ती व्हेंटिलेटर आणि डायलिसिसमुक्त आहे. तिला बऱ्यापैकी आराम लाभतो आहे. या संपूर्ण काळात तिच्या चेहऱ्यावरील स्मित तिने कधी हरवू दिले नाही. 

माझ्या मनात आले, की आज आपण तिला फक्त औपचारिक शुभेच्छा द्यायच्या नि ठरल्या दिनक्रमात अडकायचे? इतके पुरसे आहे? तिचा वाढदिवस साजरा का करू नये? आपल्या आयसीयूमधील रुग्णांचे वाढदिवस आपण साजरे का करू नयेत? आयसीयूमधील डॉक्‍टर्स आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र, त्याचबरोबर आपल्या रुग्णांसमवेत त्यांचे एक भावनिक नातेही जुळलेले असते. डॉक्‍टरांचा असणारा हा भावनिक चेहराही रुग्णाला दिसायला हवा, त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा, आनंद अनेकदा निम्मी लढाई जिंकून देऊ शकते. या विचारचक्रातून मी मनातून निर्णय घेतला. चांगल्या निर्णयाची अंमलबजावणीही त्वरित व्हावी, म्हणून त्याची सुरवात तिच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याचे ठरविले. ऋतिकाने दाखवलेल्या धैर्याला ही एक प्रकारची दाद ठरेल, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हा वाढदिवस साजरा करण्याचे आमच्या आयसीयूमधील सहकाऱ्यांच्या बैठकीत ठरले. तसे मी जाहीर करताच संपूर्ण युनिटमध्ये एक प्रकारचे चैतन्य पसरले. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मग काय! लगेच जबाबदाऱ्यांचे वाटप झाले. स्टाफ आणि समन्वयक कामाला लागले. केक, शुभेच्छापत्र आले. प्रशासनातील, नर्सिंग विभागातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. ऋतिकाच्या आई-बाबांना, तिच्या लाडक्‍या धाकट्या बहिणीला आणि तिच्या मित्रपरिवारालाही झटपट आमंत्रणे गेली. हे आयसीयू आहे, याचा काही वेळ जणू सर्वांना विसरच पडला होता.

इतक्‍या कमी वेळेत ठरूनही मात्र चोख नियोजन आणि सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ खूपच मस्त झाले. आपला वाढदिवस साजरा होणार आहे, हे समजल्यानंतर ऋतिकाला अत्यंत आनंद झाला. आमचे डॉक्‍टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सपोर्ट स्टाफपासून सुरक्षारक्षकापर्यंत सर्व जण या आनंदसोहळ्यात सहभागी झाले. प्रत्येकाने ऋतिकाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. बर्थ डे केक कापते वेळी जेव्हा सर्वांनी एका स्वरात ‘हॅपी बर्थ डे टु यू’  म्हणायला सुरू केले तेव्हा तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ती भावनिक झाली आणि तसे होणे स्वाभाविकही होते. थक्क करणारा असामान्य आणि प्रदीर्घ लढा तिने मृत्यूसोबत दिलेला होता. त्यातून तिने दाखवलेले धैर्य, खंबीरपणा सर्वांसाठी प्रेरणादायी होते आणि ते यानिमित्ताने आम्हाला सर्वांपुढे आणता आले. 

आयसीयू हे गंभीर आजारी रुग्णांसाठी असते, तिथे शक्‍य तितकी शांतता राखली जाते. तसे अपेक्षितही आहे. पण, कधी कधी असे काही क्षण साजरे करायलाच हवे, ज्यातून प्रत्येकाच्या मनातील आनंद, ऊर्जेचा प्रवाह खळाळते राहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com